बुधवार, 1 नवंबर 2017

Indian Films Marathi - 05



माझ्या तोन्या आजी साठी

इण्डियन फ़िल्म्स

(माझ्या बद्दल आणि व्लादिकबद्दल, नातेवाइकांबद्दल आणि मित्रांबद्दल
निघून गेलेल्या, चांगल्या काळाबद्दल)








अगदी-अगदी सुरुवातीपासून...

तो फोटो, ज्यांत सात महिन्याच्या मला तोन्या आजी वर छताकडे उचलते आहे, आणि मी समोर, छातीवर तीन चमचमते तारे असलेला पांढरा ओवरऑलघातला आहे, मामाचे मित्र, हैनरी आरोनोविचने घेतला होता. आजीने सांगितलं होतं की तो स्वतःच त्यादिवशी माझा फोटो काढायला आलेला होता. आणि कित्येक वर्षांनंतर हैनरी आरोनोविचने मला तीन टैन्कर्स बद्दल गाणं म्हणूंन दाखवलं होतं. गाणं मला इतकं आवडलं होतं, की नंतर मी ते पाठ करून टाकलं आणि गायलोसुद्धां होतो. मी तीन टैन्कर्स बद्दल गायचो, एरोड्रोमचं गाणं म्हणायचो, ज्यांत “कुणासाठी तर ही फक्त उड्डाणाची वेळ आहे, पण खरं म्हणजे वेळ आहे प्रेमाचा निरोप घेण्याची,” पण विशेषकरून मी – “जर मित्र निघाला अचानक...” म्हणायचो.
आजी खूप मजा घेत-घेत सांगते की मी कसा तिच्या मिलिट्री यूनिटच्या ऑफ़िसमधे गेलो होतो, टाइपिस्ट मुली जिथे बसतांत, त्या खोलीत गेलो, आणि जोराने गाऊं लागलो: “जर मित्-त्र निघाला अच्-चानक...”आजीला माझ्यामुळे खूप अवघडल्या सारखं वाटंत होतं – मी इतक्या ज़ोराने आणि इतकं अगदी बरोब्बर गात होतो. म्हणून दुसरा स्टैंज़ा सुरू करतांच तिने आपल्या सहकारी टाइपिस्ट स्पिरीनाकडे बघून, जी खोटंखोटं हसंत होती, म्हटलं: “सिर्योझेन्का, तू पूर्ण गाणं म्हटलं नं!” मी उत्तर दिलं: “पूर्ण कसं म्हटलं, जेव्हां अजून दोन स्टैंज़े शिल्लक आहेत?!” आणि मी गात राहिलो: “जर तर्-रूण पहा-आडावर – म्हणंत नाही – आह, घाबरून अचानक आणि खाली...”आणि असाच शेवटपर्यंत गातंच राहिलो. काही हरकत नाही, स्पिरीना सहन करंत होती आणि मंद-मंद हसंत होती. आता ती कुठे असेल?
आजीचं ऑफिस सुटल्यावर आम्हीं बरेचदां बेकरीत जायचो, जी आमच्यांच बिल्डिंगमधे होती. बेकरीतले सगळे लोक आम्हांला ओळखायचे – तिथे पण मी, स्वाभाविकंच आहे, धिंगाणा करंत होतो, पण सेल्सगर्ल्सला मी खूप आवडायचो. आत घुसल्याबरोबर, मी जातो, ब-अ-घ-तो, सगळं ठी-ईक आहे नं!असं म्हणंत सरळ तिकडे गेलो, जिथे ब्रेड ठेवलेली असते, म्हणजे ग्राहकांना तेथे जाण्यांची बंदी आहे. तेथून बाहेर निघालो तेव्हां माझ्या अंगावर डोक्यापासून ते पायांपर्यंत टोस्ट आणि रिंगसारखी ब्रेड लटकंत होती, मी रिपोर्ट दिली: “सगळं ठी-ईक आहे!” फक्त माझ्या तोन्या आजीला ठीक नव्हतं वाटंत, कारण तिला इतके सगळे टोस्ट्स घ्यायचेच नव्हते. सेल्सगर्ल्स हसत होत्या आणि म्हणंत होत्या की त्या मला हे सगळे टोस्ट्स आणि रिंग-ब्रेड विकायला तयार आहेत. पण मला रिंग-ब्रेड घ्यायचीच नव्हती, मला तर फक्त ब-अ-घायचं होतं, की सगळं ठी-ईक आहे किंवा नाही,” आणि मी माझ्या अंगावरून सगळ्या रिंग-ब्रेड्स काढून टाकल्या, तोन्या आजीला त्यांचे पैसे नाहीं द्यावे लागले.

औषधी पाल्यांचा संग्रह...
मी माझ्या भावाबरोबर तुखाचेव्स्की भागांतल्या पाचव्या नंबरच्या फार्मेसी जवळ एका बेंचवर बसलोय. बाजूला दोन बैग्स पडल्या आहेत. त्यांत घडी केलेल्या मोठ्या-मोठ्या पिशव्या, मोठा किचनचा चाकू (हे व्लादिकच्या बैगमधे, आणि माझ्या बैग मधे – कोयता), थर्मस आणि सैण्डविचेज़ आहेत. आम्ही बससाठी थांबलोय, कारण की आम्हांला शहराच्या बाहेर जाऊन आग्याची पानं गोळा करायचीत.
जवळंच जुने जैकेट्स आणि डोक्यावर रुमाल बांधून फार्मासिस्ट (औषध निर्माता) मुली उभ्या होत्या आणि हसंत होत्या. (औषधीय जडी-बुट्या तयार करण्याची जवाबदारी त्यांची असते). लवकरंच बस येते आणि इंजन सुरू करतांना ड्राइवर वीत्या म्हणतो: “राचेव्काला चाललोय”. बसमधे ह्या फार्मासिस्ट मुली आणि एक हात वाले आजोबा ( त्यांना एकंच हात असला तरी ते माझ्यापेक्षां दुप्पट आग्याची पानं गोळा करतांत) म्हणतील की आम्हीं कित्ती चांगली मुलं आहोत, की आपल्या पिक्चर साठी आणि आइस्क्रीमसाठी पैसे स्वतःच जमवतो. काय माहीत कां, पण त्यांना असं कां वाटतं की पिक्चर आणि आइस्क्रीमशिवाय आम्हांला जीवनांत आणखी कशाचीही गरजंच नाहीये. त्यांना सांगायलांच हवं की मी कसा चांगल्या ग्रेडने पास झालो आणि कसं मला पंचवीस रूबल्सचं बक्षिस मिळालं होतं, जे मी त्याच दिवशी ऑनलाइन गेम शीपामधे हरलो सुद्धां. जर कुणाला माहीत नसेल, तर सांगतो की शीपापत्त्यांच्या एक गेम असतो. पण मी काहीचं नाहीं म्हणंत, कारण, जर कुणाला कळलं की मी पैसे लावून पत्ते खेळतो, तर...म्हणजे, काही सुद्धां चांगलं झालं नसतं.
उद्या, जेव्हां आम्हीं पुन्हां पाच नम्बरच्या फार्मेसीजवळ बसची वाट बघत असूं (आणि तेव्हां माझ्या बैगमधे कोयत्याच्या ऐवजी मोठा चाकू पडलेला असेल, कारण की कोयत्याने आग्याची पानं तोडायला त्रास होतो, तसं ती मस्तंच कापली जातात), तेव्हां एकदम पाऊस पडू लागेल. पावसांत तर कोणी औषधी पाला गोळा करायला जात नाही, आणि आनंदाने घरी परत जाऊं शकू आणि तोन्या आजीसोबत चहा बरोबर सैण्डविच खाऊ. व्लादिक नव्याने वाचलेल्या फ़ैन्टेसीच्या पुस्तकाबद्दल सांगेल आणि मला आणि तोन्याला काहीच कळणार नाही आणि आम्ही नुसते हसतंच राहू, तेव्हां व्लादिकला खूप राग येईल. शेवटी आमच्यांत डोईफोड नाकतोडे” ह्या फिल्ममुळे समेट झाला, जी, असं कळलं की स्मेनाथियेटरमधे दाखवतांत आहे. त्यांत असा कमालीचा कुंग-फू आहे! आणि हीरोचं नाव सुद्धां चायअसं आहे. व्लादिकंच मला ही फिल्म दाखवायला घेऊन गेला होता, आणि ही एक अशी फिल्म होती, जिला आम्हीं कमीत कमी तीन-चार वेळां नक्कीच बघायचो. तर, आम्हीं स्मेनाला जातो, मग, जेव्हां “डोईफोड नाकतोडे” जुबिलीथियेटरमधे दाखवतील, - तेव्हां आम्हीं जुबिलीला जाऊं, आणि पुन्हां माझ्या डोक्यांत एक नवा आइडिया येईल, की काय केलं पाहिजे: आपणंच एक्वेरियम्स बनवायचेत आणि डज़न्सने त्यांना विकायचे. शाळेच्या ग्रीन हाऊस मधून आम्हीं थोडेसे काच आणू, एपोक्साइड-ग्लू विकत घेऊं, ज्याने काचा चिकटवतां येतील, आणी इतकी साधारणशी वस्तू बनवूं, जी बाजारांत अजून आलीच नाहीये. पण आपली वस्तू आम्हीं विकायला नाही घेऊन जाणार.

इण्डिया, दोन सिरीज़....
पहिली इंडियन फिल्म, जी मी बघितली होती, ती होती फिल्म सम्राट’. आणि फिल्म बघितल्यानंतर मी लटपटत्या पायांनी, तोंड उघडं ठेवून, आजूबाजूच्या कोणत्याही गोष्टीकडे लक्ष न देतां आणि सारखं चुकीचं वळण घेत, घरी चाललो होतो आणि क्वार्टरमधे घुसतांच मी म्हटलं:
“तोन्, तुला माहित आहे कां, की हिटलरपेक्षांही जास्त वाईट कोण आहे?’
“अरे,” तोन्या आजीने आश्चर्याने विचारले, “हिटलरपेक्षांही जास्त वाईट कोण बरं असूं शकतो?”
थोडा वेळ शांत राहून आणि दूरवरच्या मुम्बईहून घरी येता-येता मी म्हटलं:
“बॉस.”
निश्चितंच! तो हिटलरपेक्षां कितीतरी पटींनी दुष्ट आहे, कारण त्याने कैप्टन चावलाला कित्ती वर्षं तळघरांत कैदेंत ठेवलं होतं. कैप्टन चावलांच एकटा असा माणूस होता, ज्याला सोन्याने भरलेल्या जहाज सम्राटला समुद्रांत कुठे बुडवलंय, ती जागा माहीत होती! आणि कैप्टन चावलाने त्या जहाजाला बॉसच्या हुकुमानेच बुडवलं होतं! आणि जर फिल्मचे खास हीरो राम आणि राज नसते, तर माहीत नाही आणखी किती वर्षं त्याने दुष्टपणाची कामं केली असती.
मी व्लादिकला तपशीलवार सम्राटची गोष्ट सांगतो, आणि आम्हीं लगेच ही फिल्म बघायचं ठरवतो. व्लादिकलापण फिल्म खूप आवडते, पण फक्त जेव्हां आम्हीं हॉलमधून बाहेर पडंत होतो, तेव्हां तो म्हणाला, की शेवटच्या सीनमधे बॉसला फक्त तीन गोळ्या मारल्या होत्या, वीस नाहे, जसं मी त्याला सांगितलं होतं. पण मला वाटलं होतं की वीस होत्या!
आणि त्याच्यानंतर मी लागोपाठ एका मागे एक “तकदीर”, “जागीर”, “हुकूमत”, “शोले”, “मुझे इन्साफ़ चाहिए!” – ह्या फिल्म्स बघितल्या आणि मला आता माहितीये की तो, जो “सम्राट”  फिल्ममधे रामचा रोल करंत होता – तो एक्टर धर्मेंद्र आहे, “शोले”मधे तो वीरूचा रोल करंत होता, आणि तो, जो बॉस होता, - तो अमजद खान आहे, तो “शोले”मधे तसल्यांच घाणेरड्या माणसाचा रोल करंत होता, फक्त आता त्याचं नाव होतं गब्बर सिंग. मग मी “शक्ति”, “खुद्दार”, “मुकद्दर का सिकंदर”, “त्रिशूल”, और “जंजीर” बघितली आणि मी अमिताभ बच्चनच्या प्रेमातंच पडलो, जो ह्या सगळ्या फिल्म्समधे आणि, “शोले”मधे सुद्धां प्रमुख रोल करतोय, आणि सगळ्यांत त्याचं नाव विजयच आहे. जर मला कधी मुलगा झाला, तर मी त्याचं नाव विजयंच ठेवीन, अमिताभच्या प्रेमाखातर.
मग थियेटर्समधे राजकपूरची “आवारा” आणि “डिस्को डान्सर” दाखवतात. इण्डिया, दोन सिरीज़चा अर्थ माझ्या साठी हा आहे, की मला जावंच लागेल, कारण, फिल्म चांगलीच असेल, आणि मी ताबडतोब दोन्हीं फिल्म्स बघण्यासाठी धावतो. “आवारा” तर मला खूपंच आवडते. पण चार वेळां “डिस्को डान्सर” बघितल्यावर (त्यांत हीरो आहे मिथुन चक्रवर्ती – हा तोच आहे, ज्याने “जागीर”मधे फ़ैक्ट्री-मालक रणधीरच्या लहान भावाचा रोल केला होता) मला चांगलंच समजलंय की मोठा झाल्यावर मी एक्टरंच होईन, आणि “डिस्को डान्सर – 2” मधे काम करेन, मिथुन चक्रवर्तीबरोबर. आणि, अचानक “डिस्को डान्सर-2” येते! पण ह्या फिल्मचं नाव आहे “डान्स डान्स!” मुख्य रोल पण मिथुन चक्रवर्तीनेच केला आहे, डाइरेक्टर सुद्धां तोच बब्बर सुभाष आहे, ऑपरेटर राधू करमाकरचं आहे, तोच म्यूज़िक डाइरेक्टर – बप्पी लहरी आहे! जेव्हां मी वर्कर्स वेमधे सव्रेमेन्निकथियेटरची घोषणा आणि हे वाक्य बघितलं: “फिल्म “डिस्को डान्सर”च्या सोवियत फैन्स साठी”, तेव्हां पाच मिनिटासाठी मी जणु आनंदाने मरूनंच गेलो! आणि न जाणे कां, हे पण आवडलं की “डिस्को डान्सर” फक्त मलाच नाही, तर सगळ्यांच सोवियत दर्शकांना आवडतो!
मग एक वेळ अशी देखील येते, जेव्हां आमच्या शहराच्या थियेटर्समधे इंडियन फिल्म्स येतंच नाहीत. मी ‘09’ ह्या नंबरवर शहराच्या सिनेमा- डिस्ट्रीब्यूटर ऑफिसमधे फोन करून विचारतो की कोणची नवी इण्डियन फिल्म दाखवणार आहे कां. मला सांगण्यांत येतं की लवकरंच “प्यार करके देखो” नावाची फिल्म येणार आहे आणि रिसीवर ठेवून देतात. मी विचारूं सुद्धा शकलो नाही की त्या फिल्ममधे कोण-कोणचे एक्टर्स आहेत. पुन्हां फोन करतो, विचारतो, की “फिल्म प्यार करके देखो”चा हीरो कोण आहे. मला कळायला तर पाहिजे नं की कोणाला पसंत करूं आणि कोणावर विश्वास ठेवू! त्यांना खूप आश्चर्य होतं, की मला ह्या गोष्टीत उत्सुकता आहे, पण टेलिफोनवाल्या बाईने हसून म्हटलं की जेव्हां फिल्म दाखवतील तेव्हां कळेलंच, की त्यांत कोण-कोण काम करतं आहे. पण मला तिच्या बोलण्याचा टोन नाहीं आवडला. मी पुन्हां फोन करतो, आणि आवाज़ बदलून विचारतो, की एखाद्या थियेटरमधे “डिस्को डान्सर” दाखवणार आहेत कां. मला मरगळलेल्या आवाज़ात उत्तर मिळतं की नाहीं दाखवणार.
जेव्हां सकाळी मी पुन्हां फोनवर विचारतो, की आमच्या शहराच्या थियेटर्समधे इण्डियन फिल्म्स दाखवणार आहेत कां, तेव्हां ते लोक मला ओळखून घेतात:
 “मित्रा, तू काय झोपेंतसुद्धां विचार करंत होतास, की कुठे फोन करायचा आहे?”
आता मी त्यांना फोन नाहीं करंत. चांगलं नाही वाटंत. पण, मी त्यांचा मित्र कसा काय झालो?!

मी आणि व्लादिक...
फ़िल्म्स बनवतो......
लवकरंच मला असं वाटूं लागलं, की फक्त इण्डियन फिल्म्स बघणंच पुरेसं नाहीये. माझी इच्छा होती की मी स्वतः त्यांना बनवावं, अशा प्रकारे, की मी त्यांत मुख्य भूमिका करावी, स्वतःच डाइरेक्टर, स्क्रिप्ट राइटर, आणि गायकसुद्धां असावं. मी मूवी-कैमेरा घेण्यासाठी पैसे जमा करूं लागतो, ह्या बद्दल विचार करणं मात्र मला जमंत नाहीये की शूटिंग कसे होईल आणि, मुख्य गोष्ट, आमच्या फिल्म्स बघेल कोण. जसा-जसा मी विचार करंत होतो, माझी भीति वाढत होती आणि मी निराश होऊं लागलो. पण अचानक व्लादिक मला फिल्म्स बनवायची एक मस्त ट्रिक सांगतो, ज्यांत काही कैमेरा-बिमेरा नाहीं लागंत. फक्त तुम्हांला ड्राइंग मात्र यायला हवं.
तो कागदाच्या एका तुकड्यावर एक माणूस काढतो, दुसरा कागद घेऊन – तसांच माणूस, हात वर केलेला. पहिला कागद वर ठेवतो, त्याच्याखाली दुसरा कागद ठेवतो आणि पट्कन वरचा कागद सरकवतो. माणूस हात उचलतो आहे! काय गंमत आहे! मी डिपार्टमेन्टल स्टोअरला पळतो आणि थंडीच्या दिवसांत खिडक्यांवर चिकटवायच्या कागदाचे खूप सारे रोल्स घेऊन येतो. ही आमची रील आहे. उभ्या डैशेसनी मी फ्रेम्सचे चिह्न काढतो आणि ड्राइंग करूं लागतो.
मन लावून चित्र काढणं मला जमंत नाही, म्हणून “बदला” नावाच्या फिल्मची दुसरी सिरीज़ येता-येता माझे सगळे हीरोज़ एक सारखे दिसूं लागते, फक्त कपड्यांच्या रंगानेच त्यांना ओळखू शकतो. खलनायकांना मी मोठं दाखवलं आहे आणि त्यांचा चेहरा सुरकुत्यांनी भरलेला दाखवला आहे. सुरकुत्या दोन जाड्या-जाड्या रेषांनी काढल्या आहेत, म्हणजे त्यांना ओळखायला त्रास व्हायला नको.
संध्याकाळपर्यंत फिल्म तयार झाली. मी एक डब्याला दोन उभी भोकं करतो, त्यांत आपली फिल्म “बदला”ची पहिली आणि एकुलती एक कॉपी फिट करतो, आणि व्लादिक माझा पहिला, एकुलता एक दर्शक होतो. जर कागदाच्या रीलला व्यवस्थित सरकवलं तर डब्ब्याच्या स्क्रीनच्या भागांत चित्रांमधले लोकं चालू लागतात, ढिशूम-ढिशूम करूं लागतात, आणि डान्स करू लागतात. असो, फिल्ममधे आवाज़ मला स्वतःलाच द्यावा लागतोय.
फिल्म शो झाल्यावर व्लादिकसुद्धां थंडीच्या दिवसांत खिडक्यांवर चिकटवायचा कागद विकत घेतो आणि काही दिवसांत त्याच्या पहिल्या फिल्म “बवण्डर”चा प्रीमियम होतो.
हळू-हळू हम आम्हीं निर्माणाच्या कामांत मग्न होऊन जातो. व्लादिक धारावाहिक फिल्म “12 निन्जास” बनवतो, जी “बवण्डर” सारखीच कुंग-फूच्या दोन प्राचीन घराण्यांमधे असलेल्या वैमनस्याची गोष्ट आहे. आपल्या फिल्ममधे तो एक नवीन  वस्तू जोडतो: हीरोज़चे डायलॉग्स रीलवर लिहितो, म्हणजे प्रत्येक फ्रेममधले त्यांचे डायलॉग्स लक्षांत ठेवण्याची गरज नाहीं.
जो पर्यंत व्लादिक “12- निन्जास” बनवंत होता ( ही फिल्म बनवायला त्याला जवळ-जवळ एक महिना लागला), मी एकदम माझ्या खूप फिल्म्स रिलीज़ करून टाकल्या: “वेगळ्या नावाने”, “डान्सिंग रेनबो”, “जनतेच्या भलाई साठी”, “खतरनाक आज़ार”, “अपूरणीय क्षति”, “गावाचा रक्षक”, “आगमन” आणि “मास्टर दीनानाथचे संगीत”. दर्शक नसल्याची समस्या पण हळू-हळू कमी होत होती. व्लादिकचे मम्मी पप्पा आणि आमचे सगळे आजी-आजोबा बिना तक्रार आमच्या फिल्म्स बघंत होते.
पण फिल्म्स दाखवतां-दाखवतां मला कळलं की जेव्हां रील मधेच तुटते, तेव्हां मला फार आनंद होतो, कारण की तेव्हां अगदी खरोखरच्या थियेटरसारखं वाटतं. रील आपणहून नाही फाटंत, आणि मी दर मिनिटाला दुर्घटनांचे चित्र दाखवतांना तिला फाडतो आणि वरून कुरकुर करतो की वाइट कॉपी आणली आहे.
पण ह्याचा परिणाम असा झाला की लोकांनी आमच्या फिल्म्स बघणं बंदंच केलं, आणि मी सुद्धां फिल्म्ससाठी ड्राइंग्स काढता-काढता बोर झालोय.
काहीही म्हणा, खरोखरच्या इण्डियन फिल्म्स जास्त चांगल्या असतात!
हरकत नाही. काही दिवसांत मी आणखी काही करेन!

माझी पणजी आजी - नताशा      
संध्याकाळी मला घरी आणणं खूपंच कठीण आहे, विशेषकरून जेव्हां थण्डीचे दिवस असतांत आणि हॉकीचा खेळ चालू असतो. टेपने गुण्डाळलेली माझी स्टिक “रूस” घेऊन मी एका गोल पासून दुसरीकडच्या गोलकडे जात असतो (आमचे गोल – लाकडाचे डब्बे आहेत, जसे भाजीच्या दुकानाजवळ पडलेले असतात), कानांना झाकणारी लांब पट्ट्यांची टोपी टेकडीवर फेकली आहे, म्हणजे ती खाली डोळ्यांवर घसरू नये, आणि खिडकीतून येणारा आवाज़, की घरी परतायची वेळ झाली आहे, कारण की अंधार झालेला आहे, ऐकूंच नाही येत.            
पण रात्रीचे दहा वाजून गेले आहेत, आणि माझी पणजी आजी बाहेर पोर्चमधे येते आणि मला ओंजारत-गोंजारत बोलावते:
“सिर्योझेन्का-आ! चल घरी जाऊं या, आजोबा आले आहेत, आणि त्यांनी काय आणलंय माहितीये! आय-आय-आय-आय!...”
मला मित्रांसमोर लाज वाटते की आजेबाची गिफ्ट हॉकीहून जास्त महत्वपूर्ण असूं शकते, पण तरीही मी थांबतो आणि नताशाकडे बघतो.
“काय आणलंय?”
“ओय, ते स्वतःच तुला दाखवतील, चल, जाऊं या.”
खरंच, मजेदार गोष्ट आहे, की आजोबाने काय आणलंय, - कदाचित दलदलीतून वेत आणले असतील, मी कित्ती दिवसांपासून मागतंच होतो. पण सध्यां तर थण्डीचे दिवस आहेत, आता कुठली आलीय दलदल?
आमच्या बिल्डिंगच्या प्रवेशद्वारांत घुसतो. मी पुढे-पुढे, नताशा माझ्या मागे. आम्हीं दुसर्या मजल्यावर राहतो, जास्त नाही चालावं लागंत, पण तरीही मी विचारतोच की आजोबाने काय आणलंय. आणि तेव्हां, हे समजून, की मी आता उडी मारून परत बाहेर रस्त्यावर नाहीं पळणार, कारण की तिने माझी वाट रोखली आहे, नताशाचा चेहरा एकदम बदलतो, आणि मला पाठीमागून एखाद्या युद्धकैद्यासारखी ढकलंत ती खडसावते:
“चल! शैतान बाहुल्या! काय आणलयं! ह्याला घरी आणणं मुश्किल आहे! बघ, तुझी स्टिक तर बाकावर तडकली आहे – नवीन नाही घेऊन देणार!!!”      
पण तरीही पणजी आजी मला फार आवडते. जेव्हां फराफोनवा (माझी लोकल डॉक्टर) पहिल्यांदा आमच्या घरी आली, तेव्हां तिने मला बघितलं आणि म्हणाली:
“ओय, कित्ती गोड मुलगी आहे!”
मी स्कर्ट-ब्लाऊज़मधे होतो, डोक्यावर रुमाल बांधला होता – म्हणजे – मी नताशाचा सम्पूर्ण ड्रेस घातला होता.
“मी मुलगी नाहीये!” मी लाजलो.
“मग, तू कोण आहेस, मुलगा?”
“मुलगी नाहीं आणि मुलगा पण नाहीं! मी पणजी आज्जी नताशा आहे, आणि माझं वय पंचाहत्तर वर्षं आहे!”
आता फराफोनवाने गंभीरतेने तोन्या आजीला समजावले की मला स्कर्ट घालूं देऊं नये, नाहीतर मला ती सवय लागेल आणि माझ्या मनःस्थितिवर ह्याचा परिणाम होऊं शकतो, पण तोन्या आजीने अत्यंत दुःखाने उत्तर दिलं की असं करणं शक्य नाहीये, आणि गोष्ट जर स्कर्टपुरतीच मर्यादित असती तर काळजीची काही बाब नव्हती, पण मी तर नताशाची सगळी भांडी घेऊन घेतलीय आणि तिचीच औषधंसुद्धां खात असतो – ब्लडप्रेशरचं , चक्कर यायचं, आणि हार्टचं... (पण मी खरोखरीची औषधं थोडीच खातो, मी वाटाण्याचे दाणे, चॉकलेट्स खातो आणि डोळ्यांत सुद्धां आय-ड्रॉप्स नाहीं, नुसतं पाणीच घालतो).
आणि नताशाचं माझ्यावर खूप प्रेम आहे. एकदां संध्याकाळी ती “छोटा गरुड” बाइसिकल घेऊन आले.
माझ्याकडे “स्कूल बॉय” होती, आणि तिला माहीत होतं की मला एक मोठी साइकल पाहिजे. बस, घेऊन आली. “ओह, जिन्यावरून मोठ्या मुश्किलीने आणली!”
आवाज़ ऐकून तोन्या आजी किचनमधून बाहेर आली.
“हे काय आहे?”
“अगं, मी मिलिट्री स्टोरच्या जवळून जात होते – ही तिथे उभी होती. अर्धा घण्टा उभीच होती, हिला घ्यायला कोणीच आलं नाही. चला, सिर्योझासाठी होईल.”
“मम्मा,” तोन्या आजी म्हणाली, “तुला अगदी वेड लागलं आहे. हिला कोणीतरी तिथे ठेवलं होतं! तुला स्वतःला सुद्धां कळंत नाहीये की काय करायचंय. परत घेऊन जा.”
आणि नताशा साइकल परत ठेवायला चालली गेली. ही तोन्या आजी घरांत नसती, तर “छोटा गरुड” माझ्या कडेच राहिली असती!
                       
समर कॉटेज.
सणाचे दिवस आणि नेहमीचे दिवस...

आजोबा शेडजवळ बाकावर बसलेत. त्यांच्या पुढे चकचकीत बाल्टी आहे, ज्यांत कांदे आणि माँस आहे. ते कबाब बनवंत आहे, आणि मी आणि व्लादिक कैम्प फायरमधे काड्या पेटवून अंगणांत हिंडतोय. ह्या आमच्या मशाली आहे. त्या पट्कन विजतांत आणि आम्हीं त्यांना पुन्हां पेटवायला कैम्प फायरजवळ जातो. त्या पुन्हां विजतांत आणि आम्हीं ठरवतो की चला ह्यांच्या तलवारीच बनवूं या. आम्हीं युद्धाला सुरुवात करतो. व्लादिक जिंकतो, कारण की त्याला जिंकायचं होतं, आणि मी, मला असं वाटतं की युद्ध सुरेख झालं पाहिजे.
आज विजय-दिवस (9 मे – अनु.) आहे, जो आम्हीं आमच्या समर कॉटेजमधे साजरा करतोय. तोन्या आजी घरांत वेगवेगळ्या प्रकारचे सॅलेड्स तयार करतेय. लवकरंच व्लादिकचे मम्मी-पप्पा येतील, आजोबचे मित्र इलीच आणि वीत्यापण येतील. वीत्या माझ्या आजोबाला मेरे बापम्हणतो. आणि निळ्या ज़ापरोझेत्सकारमधे वास्या आजोबा आणि नीना आजी सुद्धां येतील, हे व्लादिकचे आजी-आजोबा आहेत.
वास्या आजोबा बरोबर फुटबॉल बद्दल बोलायला आवडतं, कारण की ते सुद्धां सगळे मैचेस बघतात; आणि मला ते अशासाठी पण आवडतांत, की जरी ते सत्तर वर्षांचे आहेत, तरीही नेहमी कडक इस्त्री केलेलाच सूट घालतात, मस्त टाय बांधतात, त्यांचे केस नेहमी चांगले सावरलेले असतात, आणि एक सुद्धां केस हलंत नाही, वास्या आजोबाने कोल्यांट्या मारल्या तरीही.
पण माझे आजोबा, जे पण मला खूप आवडतात, नेहमी कोणची तरी सलवार घालून असतात, एकंच, जुन्या काळातला खाकी रंगाचा शर्ट आणि हल्की पिवळी तेलकट टोपी घालून फिरतांत, जी त्यांनी मी व्हायच्या खूप आधी एका रिसॉर्टवर विकंत घेतली होती.
लोकांनी माझ्या आजोबांना लेदरच्या, कॉड्रोयच्या, लोकरीच्या टोप्या दिला होत्या, आणि इलीच तर नेहमी विचारतो, की ते “आपली इमेज केव्हां बदलणार आहेत”, पण अगदी पालथ्या घड्यावर पाणी! नवीन टोप्यांचा ढेर अलमारीत पडला आहे, पण आजोबा नेहमी आपल्या फेवरेट, हल्क्या पिवळ्या टोपीतंच असतात, आणि फक्त समर कॉटेजमधेच नाही, पण फ़ार्मेसीच्या गोडाउनमधे सुद्धां, जिथे ते डाइरेक्टर आहेत.
आमचा सण मस्तंच रंगलाय. इलीच मला पिटकुलं डुक्कर म्हणतो, आणि मला खूप राग येतो. आजोबा आणि वीत्या वाद घालताहेत, की वास्याच्या “ज़ापरोझेत्स”साठी टायर्स कोण आणणार आहे, कारण वास्या आजोबा कम्प्लेन्ट करत होते की टायर्स – केव्हांच गुळगुळीत झालेत. जेव्हांपासून आमच्या कम्पाऊण्डमधे एकाच दगडावर वास्या आजोबाचे तीन टायर्स पंक्चर झाले, माझे आजोबा प्रत्येक गोष्टीत त्यांची मदत करण्याचा प्रयत्न करतात.
आणि अचानक पाऊस पडूं लागतो. आम्हीं घरांत पळतो; खुर्च्या कमीच आहेत, पण कसे तरी बसतो आणि बिघडलेल्या टेलिफोनचा खेळ खेळू लागतो. इलीच सर्वांत जास्त हसतोय, पण स्पष्टंच दिसत होतं की त्याला खरंच मजा नाही येत आहे. ह्या उलट व्लादिकचे पप्पा, मुद्दामंच नाहीं हसंत, हे दाखवायला की – बिघडलेला टेलिफोन कित्ती मूर्खपणाचा खेळ आहे – उदाहरणार्थ, चैज़च्या लेखांच्या संग्रहापेक्षा, ज्याचे दोन खण्ड ते वर्षभरापासून दर महिन्याला विकत घेतात. मला असं वाटतं की सगळ्यांनी रात्री कॉटेजमधेच थांबावं. म्हणून पाऊस रात्रभर पडतंच राहिला पाहिजे, नाहीतर माहीत नाही, सगळे लोक थांबतील किंवा नाही.
पण लवकरंच सूर्य निघाला, आणि आम्ही आपाअपल्या घरी जाण्यासाठी निघालो. वास्या आजोबा मला “ज़ापरोझेत्स”मधे घरी सोडायला तयार झाले. जशीच ते स्पीड वाढवतात, मी सीटवरून पुढे वाकतो, आणि इंजिनच्या आवाजापेक्षाही मोठ्याने, अपेक्षेने विचारतो:
“वास्, आता तू कुठेतरी घुसवशील, हो नं?! (अरे, मी नुसतीच गंमत करतोय).
“छिः, तू, घाणेरडा यूसुफ़!” वास्या आजोबा फिसकारतात आणि गाडीचा वेग कमी करतांत.
हे यूसुफ़कशाला – फक्त देवालाच माहीत.
सणाचे दिवस सोडले तर फक्त मी आणि तान्या आजीच समर कॉटेजकडे जातो. कधी-कधी व्लादिक पण आमच्या बरोबर येतो, पण आजकाल त्याला एक मित्र सापडला आहे – ल्योशा सकलोव, ज्याची तो इतकी काळजी घेतो, की मला पण दाखवायला लाजतो. ठीकंच आहे, जर मी सांगून टाकलं की आम्हीं खिडक्यांना चिकटवायच्या कागदावर कशा प्रकारे फिल्म्स बनवल्या होत्या, तर?
तर, मी आणि तोन्या टेकडीवर चढ़तो, आणि सतत घाण वास सोडंत असलेल्या नदीच्या वरचा पुल पार करतो, आणि तिथून समर कॉटेज फक्त दोन हात दूर आहे. बैक-पैक्स काढल्या-काढल्या मी शेजारच्या आन्ना बिल्याएवा, विक्टर पेत्रोविच आणि कुबड्या आन्ना मिखाइलोव्नाकडे धाव घेतो.
आन्ना बिल्याएवा मला ससाम्हणते आणि माझ्याशी बोलत असताना सतत पुचकारंत असते. आश्चर्य म्हणजे, मला तीच सगळ्यांत जास्त आवडते. पण आन्ना बिल्याएवाच्या डोक्यावर नेहमी रुमाल बांधलेला असतो, ती जशी सतत धुळीने माखलेली असते, आणि तिचं पुचकारणं खराब नाहीं वाटंत.
विक्टर पेत्रोविच माझ्याकडे कमी लक्ष देतात, पण त्यांचं घर खूप मोट्ठं आणि सुरेख आहे आणि दारासमोर गारगोट्यांचा ओटा आहे. ह्या गारगोट्यांना घासून मी ठिणग्या काढतो. आणि जर जास्त वेळ घासलं तर गारगोट्यांमधून जळक्या कोंबडीचा वास सुटतो. कधी-कधी असंही होतं की मी हट्ट करून तोन्या आजीला पण गारगोट्यांचा वास घ्यायला लावतो. एकदा तोन्या आजी माझ्या जवळपास नव्हती, म्हणून मी कुबड्या आन्ना मिखाइलोव्नाला गारगोट्यांचा वास घ्यायला सांगितला. तेव्हांपासून ती जोर देऊन सांगते आहे, की आम्ही आमचा रास्बेरीचा वेल कुठे दुसरीकडे लावावा, कारण तो तिच्या अंगणांत पसरंत आहे.
आणि, काहींच दिवसांपूर्वी आमचं गेट उघडतं आणि बुदुलाय (प्रसिद्ध फिल्म जिप्सीचा हीरो) आत येतो. “जिप्सी”तर मला काही इण्डियन फिल्म्सपेक्षांही जास्त आवडते, आणि इथे – अगदी खरोखरंचा बुदुलाय, दाढीवाला, किंचित पांढरे केस असलेला, मसल्स-मैन, आणि माहीत नाही कसा, पण तो तान्या आजीला ओळखतो!
“अन्तोनीना इवानोव्ना!” तो ओरडतो.
आजी बाहर येते, आणि सांगते की हा ईल्या अंद्रेयेविच आहे, ज्याच्याबरोबर ती एके काळी काम करायची. पण माझ्यासाठीतर तो – फक्त अंकल बुदुलाय आहे.
त्याला आवडतं की मी त्याला ह्या नावाने बोलावतो. मल कळतं की त्याची समर कॉटेज आमच्या कॉटेजच्या अगदी जवळंच आहे, आणि मी आता सम्पूर्ण दिवस तिथेच घालवतो. बुदुलायकडे मोट्ठाले एपल्स आहेत, गुलाबी रंगाचे, आणि आता हा माझा फेवरेट ब्राण्ड झालेला आहे, आणि त्याच्या घराच्या भिंतींवर आमच्या ड्रामा थियेटरच्या जुन्या शोचे – “हाजी नसरुद्दीन परत येतो”चे पोस्टर्स लागले आहेत, आणि बुदुलाय मला सुद्धां आमच्या घराच्या भिंतींवर लावायला काही पोस्टर्स देतो. त्याला एक मुलगापण आहे – अंद्रेइ, त्याच्याबरोबर मी ग्रीन हाउस बनवतो, म्हणजे, तो आणि बुदुलाय बनवतात, आणि मी जवळंच फिरतोय, आणि अंद्रेइला ड्रममधे बॉल फेकायला बोलावतो. थोडा प्रयत्न केल्यावर मी बॉल ड्रम मधे टाकूनंच देतो, आणि आम्हीं मोट्ठी, खडबडीत, हिरवी बॉल पाण्याने भरलेल्या मोट्ठ्या, लोखंडाच्या ड्रम मधे फेकूं लागतो. मग जेवायला वाढतात. मला भूक नाहीये, पण जेव्हां मी बघितलं की बुदुलायनी कसे चाकूने डब्बा-बंद पदार्थ उघडले आणि चाकूनेच त्यांना हलवून त्यांत ब्रेड बुडवूं लागला, तेव्हां मला कळलं की मी फुकटंच आपल्या वाट्याच्या जेवणाला नाहीं म्हटलंय, आणि मी म्हणतो, “द्या”. बुदुलायने डब्यांतून माझ्यासाठी काही पदार्थ काढण्यासाठी एक बाउल घेतला, पण माझ्यासाठीतर बाऊलपेक्षां सरंळ डब्ब्यातूनच खाणं जास्त महत्वपूर्ण आहे, आणि मी विचारतो, “मी सुद्धां असंच सरंळ डब्यांतून खाऊं शकतो कां.” बुदुलाय मंदस्मित करतो, खास माझ्यासाठी एक डबा उघडतो आणि माझ्या हातांत चाकू देतो, त्याला कळत होतं की फोर्कने मला जेवण तेवढं स्वादिष्ट नाही वाटणार.
आणि म्हणतांत, की जो चाकूने खातो – तो दुष्ट असतो. बकवास. बुदुलाय, कदाचित, बहुतेक वेळां चाकूनेच खातो, आणि त्याच्यापेक्षां चांगला माणूस मी नाही बघितला.                                           

मी आणि व्लादिक – लेखक...

रात्रीचे अकरा वाजून गेलेत. पण मी आणि व्लादिक जागेच आहोत. आम्हीं मोठ्या खोलीत टेबलाशी बसलोय, आणि आपल्या नोटबुकवरून डोकं काढंत नाहीये. आमच्या वर प्लास्टिकच्या अनेक माळांनी वेढलेला एक छोटा लैम्प लटकतो आहे, आणि कधी-कधी असे वाक्य ऐकूं येतांत : “मी दुसरा भाग सुरू करतोय” किंवा “आणि माझा दुसरा चैप्टर प्रेमाबद्दल असेल”.
हे, आम्हीं नॉवेल्स लिहितोय. जेव्हांपासून व्लादिकने एक लहानशी गोष्ट : “थण्डीची तयारी” लिहिलेली एक जुनी, भुरकट रंगाची नोटबुक आणली होती, माझं मन “सैनिक” ह्या खेळांत रमंत नाहीये आणि मला प्लास्टीसिनची खेळणी करायला पण  नाहीं आवडंत. सुरुवातीला मला आश्चर्यच झालं, की माझ्या डोक्यांत आपणहूनंच हा विचार कसा नाही आला, की एक नोटबुक विकत घेऊन त्यांत पाहिजे ते लिहितां येतं, आणि मग लेखकपणामाझं सर्वांत फेवरेट काम झालं असतं – हो, फुटबॉल शिवाय! बस, मी असल्या फाल्तू गोष्टी नसत्या लिहिल्या, जसं - “थण्डीची तयारी”. ह्या गोष्टीत फक्त येवढंच सांगितलं आहे, की आपल्या स्कीज़ला गुळगुळीत कसं करावं, म्हणजे त्या व्यवस्थित घसरतील, आणि खिडक्यांना लुगदी लावून कसं बंद करावं, म्हणजे हवा आत नाहीं येणार. व्लादिकने लिहिलंय की खिडक्यांना स्पंजने बंद करणं सर्वांत उत्तम आहे. पण हे मजेदार नाहीये, आणि थण्डीसाठीच्या सम्पूर्ण तयारीबद्दल व्लादिकने फक्त दीडंच पान लिहिलंय! मी ठरवलं की लिहीन, तर एकदम कादम्बरीच लिहीन.
माझ्या पहिल्या कादम्बरीचं शीर्षक आहे “विसरलेल्या आडनावाचा”. त्यांत असं लिहिलं आहे, की कसा एक मुलगा खूपंच बोरहोत होता, तो हॉकी सेक्शनमधे स्वतःचं नाव नोंदवायला चालला होता, पण रस्त्यांत काही कैनेडियन्सने त्याच्यावर हल्ला केला, त्याला खूप मारलं, आणि तो आपली स्मरण शक्तिच गमावून बसला. शेवटी हा मुलगा आपल्या आजोबाला भेटतो आणि त्याची स्मरण शक्ति परत येते. व्लादिक, ज्याने “थण्डीच्या तयारी” नंतर आणखी काहींच लिहिलं नव्हतं, माझी गोष्ट वाचतो आणि मग आम्हीं दोघं बरोबर लिहूं लागतो.
मी तीन खण्डांची कादम्बरी “ इवान – शिकारी आजोबांचा नातू” सुरू करतो, आणि व्लादिक एक थ्रिलर - “सगळ्यांना असंच असायला पाहिजे”ची सुरुवात करतो. जेवढ्या वेळांत तो आपली कादम्बरी पूर्ण करतो, तेवढ्यांत मी फक्त माझी तीन खण्डांची कादम्बरीच नाहीं तर, एक छोटीशी कादम्बरी गद्दारसुद्धां पूर्ण करतो. मग आम्हीं खूपदां “एम्फिबियन मैन” (भूजलचर मानव) नावाची फिल्म बघतो, आणि अचानक आमची ढीगभर पुस्तकं तयार होऊन जातांत. व्लादिकचं – “किरण-मानव”, आणि माझी -  “वायु-मानव”, “चुम्बक-मानव” आणि “धातु-मानव”. किरण-मानव फक्त डोळ्यांनीच कोणच्याही वस्तुला जाळू शकतो. वायु-मानव, जर आपल्या नाकांत स्प्रिंग घालून शिंकला, तर मोट्ठं चक्रवाती वादळ आणू शकतो. चुम्बक-मानव सोन्याला आकर्षित करतो, आणि धातु मानव फक्त खूप शक्तिशाली आणि खूप चांगला आहे. आणि बदमाश लोकं ह्या सगळ्या मानवांचा आपल्या नीच कामांसाठी उपयोग करायचं ठरवतांत, पण, स्पष्टंच आहे, ते ह्यांत सफल नाही होत.
व्लादिकला आपल्या पुस्तकांमधे चित्र काढायला आवडतं, पण माझी ड्राइंग चांगली नाहीये; पण माझ्या नोटबुकच्या मुखपृष्ठावर नेहमी त्या पुस्तकाचे मूल्य, प्रकाशन वर्ष, प्रत संख्या आणि संक्षिप्त विवरण असतं. उदाहरणार्थ “दहा अविजित” ह्या कादंबरीचे संक्षिप्त विवरण असे आहे: “डाकू, समुद्री डाकू आणि इतर लोकांबद्दल कादम्बरी”. आणि माझ्या सगळे नॉवेल्स व्लादिकच्या नॉवेल्सपेक्षां मोठे आहेत. माझी सगळ्यांत छोटी कादम्बरी “सीक्रेट प्लेस” ब्याण्णव पानांची आहे, अनुक्रमणीका धरून, आणि व्लादिकचे नॉवेल्स पन्नास-पन्नास, चाळीस-चाळीस पानांचे आहेत. नॉवेल मोठं असणं माझ्यासाठी खूप जरूरी आहे आणि तो अनेक खण्डांमधे सुद्धां असायला पाहिजे, कारण तेव्हां मला अनुक्रमणिका लिहिणं फारंच चांगलं वाटतं. कधी-कधी तर मी अध्यायांचे शीर्षक आधीच ठरवतो, अनुक्रमणिका लिहून टाकतो आणि तेव्हांच कादम्बरीची सुरुवात करतो.
काही दिवसांनंतर व्लादिकने लिहिणे बंद केले, कारण की, “तसंही काहींच तर छापलं जाणार नाही”. मी व्लादिकला सांगतो की कधी न कधी तर छापतीलंच, आणि समजा नाहींच छापलं तरी आपल्या नोटबुक्संच एखाद्या पुस्तकापेक्षा कमी नाहीत, कारण त्याच्यावर किंमत आहे, प्रत-संख्या आहे, पण त्याला पटवूं शकलो नाही.
आता मी एकटाच “बेलोरशियन लोककथा” लिहितोय.   

मी आणि व्लादिक – बिज़नेसमैन

आमच्या शहराच्या सीमेवर, तिथे, जिथे ट्राम नं. 3 वळण घेते, अचानक एक भंगार-मार्केट उघडतं. तिथे एक-एक रूबलमधे परदेशी च्युईंग गम विकतात, आणि माझ्याकडे आणि व्लादिककडे जसेच पैसे जमतात, आम्हीं तिकडे जातो. भंगार मार्केटमधे नुसतंच च्युईंग गम नाहीं, पण अनेक प्रकारच्या वस्तू विकल्या जातांत, आणि माझ्या डोक्यांत विचार येतो की जर पिठाचे बुटके बनवले, त्यांना गडद रंग दिला आणि त्यांच्यावर लाखेचे कवर चढवले तर लोक हसंत-हसंत विकत घेतील. मी व्लादिकला हा आयडिया सांगतो, आणि थोडं फार नाही, नाहीकेल्यानंतर तो तयार होतो. आम्ही पीठ, मीठ, गडद रंग आणि वेष्टनासाठी लाख विकत घेतो, जो बुटक्यांसाठी लागेल.
भंगार मार्केट फक्त सुट्टीच्या दिवशीच भरतं, आणि शनिवारी संध्याकाळी आम्ही किचनला प्रॉडक्शन-यूनिटमधे बदलून टाकतो. आम्ही बुटक्यांना बेकिंग पैनमधे ठेवतो, पीठ खूब गरम करतो, मग पैन बाहेर काढतो, बुटक्यांना थोडा वेळ गार होऊं देतो, मग त्यांना रंग देऊन झाल्यावर त्यांच्यावर लाख चढवतो. सम्पूर्ण क्वार्टरमधे लाखेचा वास भरून जातो, पण कलेसाठी काहींतरी बलिदानतर द्यावंच लागतं! 
भंगार मार्केटमधे जागा मिळवायला तिथे चार वाजता पोहोचावे लागते. म्हणून बुटक्यांना चिंध्यांच्या डब्यांत व्यवस्थित ठेवून, म्हणजे एकही तुटायला नको, मी आणि व्लादिक, झोप पूर्ण न करतांच पाई-पाई अर्धवट अंधारांत शहरांतून चालत जातो, आणि आमच्या शंभर मीटर्स मागे-मागे तोन्या आजी येते आहे, मी घाबरू नये म्हणून. आम्ही जागा पटकावतो, आणि आमचे बिज़नेस-शेजारी शुभकामना देत आमचं स्वागत करतात. त्यांच्या डोक्यांत हा विचारसुद्धां येत नाहीये की आम्हीं त्यांच्याशी प्रतिस्पर्धा करूं शकूं . खरंय, इकडे-तिकडे बघितल्यावर मला खूप विचित्र वाटायला लागतं, कारण की माझा आणि व्लादिकचा स्टाल इतर स्टाल्सपेक्षा खूपंच दयनीय भासत होता. जरा विचार करा: भला मोट्ठा स्टाल आणि त्यावर उभे आहेत दहा बुटके, आगपेटीच्या साइजचे, जेव्हां इतरांकडे आपल्या सिल्क आणि मखमलसाठी जागा अपुरी होती आणि त्यांना बरंच काही हातांतंच धरावं लागतंय. वरून, थोड्या-थोड्या वेळाने तोन्या आजी येते आणि व्लादिककडून बुटके घेऊन जाते, कारण की मी तिला विकत नाहीये.
पण मग तोन्या आजी कुठेतरी गायबंच होते, भंगार मार्केट आपल्या नावाप्रमाणेच खूप हल्ला करतंय, आणि मी जोरजोरांत ओरडून आणि लोकांना जबर्दस्ती आपले सगळे बुटके विकून टाकतो, आणि शेवटचे दोन – एक रूबलमधे नाहीं, जसं आम्हीं ठरवलं होतं, पण पन्नास कोपेकमधे विकतो, तरीही मी खूप खूश आहे.
व्लादिक पूर्ण प्रयत्न करतो, की त्याच्या बुटक्यांजवळ कोणी येऊं नये. हनुवटी हातांत धरून तो ग्राहकांकडे पाठ फिरवून बसलायं आणि असं दाखवतोय की त्याला इथे एखादी भयंकर गोष्ट होण्याची भीति आहे. मी माझ्या आरड्या-ओरड्याने एखाद्याचं लक्षं वेधलं, तर तो स्वतःला आखडून घेतो आणि बस, स्टॉलच्या खाली घुसायच्यांच बेतांत असतो. मी त्याला समजूं शकतो – कारण आपला माल विकण्यासाठी जेव्हां मी अश्या लोकांचं लक्षंसुद्धां खेचतो, जे हात हलवून देतात आणि पुन्हां-पुन्हां सांगतांत की त्यांना हत्तीमधे कधीच इंटरेस्ट नव्हता.
“हे हत्ती नाहींत, बुटके आहेत!” मी त्यांच्यामागे ओरडतो. “हे बहुमूल्य आहेत, जापानी कारीगरी नेत्सुकेहून कमी नाहीये, कारण ह्यांना हाताने बनवलं आहे आणि फक्त एक-एकंच बनवलं आहे!!!”
हे सगळं सहन करणं प्रत्येकाला जमंत नाही.
आम्हीं बुटक्यांची गोष्ट पुन्हां करंत नाही, पण आमचा बिज़नेस चालूच राहतो. मी रस्त्यावरचे गोटे जमवतो, त्यांना छान धुतो, त्यांना पैकेट्समधे बंद करतो, आणि मण्डईसारखं ओरडून-ओरडून विकतो, “एक्वेरियमसाठी गोटे, थेट बायकालच्या तळातून आणलेली”. खरंच सांगतोय की मी पाच पैकेट्स विकलेत.
मग मी आणि व्लादिक मत्स्य पालनाचं काम करतो, आम्हांला फ्राय-फिश उत्पन्न करून विकायची होती, पण आमच्याकडे नेहमी गप्पीज़’ (रेनबो फिशेज़)च उत्पन्न होतात, आणि नेचरज़ू पार्कमधे तर तसले मासे खूप आहेत.
आइस्क्रीमचा बिजनेसपण बरा चालतो, पण डिपार्टमेन्टल स्टोअरपासून बाज़ारापर्यंत नेता-नेता बॉक्समधली अर्धी आइस्क्रीम वितळून जाते, आणि जी वितळंत नाही, तिच्यातला बराचसा भाग घरच्या लोकांबरोबर स्वतःलाच खावा लागतो.
घरी बनवलेल्या साबणाच्या आठ पेट्या एका सेकन्दात संपतात, कारण बाजारांत साबण कुठेच नाहीये, पण करणार काय, आजोबाच्या गोडाउनमधे फक्त आठंच पेट्या होत्या.
तेव्हां व्लादिकची मम्मा एखाद्या अनुभवी सेल्समैनसारखी अशी व्यवस्था करते, की आम्हीं चैरिटी-फण्डसाठी लॉटरीचे टिकिट्स विकावेत. आम्हीं लेनिन स्ट्रीटवर जातो, जी आमच्या शहरातली मुख्य स्ट्रीट आहे, आणि दिवसभरांत एक तृतीयांश टिकिटं विकतो. हँ, हे सांगून टाकतो, की कोणालांच काही विशेष बक्षिस नाहीं मिळालं, आणि आम्ही विचार करतो की जर उरलेले टिकिट्स उघडले तर जिंकलेली रक्कम, आमच्या मूळच्या रकमेपेक्षां जास्तंच होईल. आम्हीं टिकिट्स उघडतो.
आता मुख्य गोष्ट – चैरिटी फण्डाचा हिशेब वेळेवर द्यायचा असतो, तेव्हांच आम्हांला नवीन बिज़नेस सुरूं करता येईल...

फुटबॉल-हॉकी
“ह्या खट्याळ मुलामुळे मी आपल्यांच घरांत प्रसिद्ध कलाकारांची कॉन्सर्ट नाहीं बघू शकत!” आजोबा कुरकुरतं आहेत, पण तरीही किचनमधे चहा प्यायला निघून जातांत, आणि शेवटी मी टी.वीचं चैनल बदलतोच, मी प्रोग्राम नं. 2वर येतो, जिथे पंधरा मिनिटांपासून फुटबॉल चालू आहे. “स्पार्ताक” – “दिनामो”(कीएव). दसाएव, चिरेन्कोव, रदिओनोव, ब्लोखिन, बल्ताचा, मिखाइलिचेन्को, आणि हे न जाणे कोणत्या कलांकारासाठी चिडचिडताहेत!
आमच्या घरी फक्त एकंच टी.वी. आहे, आणि म्हणून, फुटबॉल आणि हॉकीचे सगळे मैचेस बघण्यासाठी, जे अधून-मधूनंच दाखवतांत, मला चार वर्षांचा असतानांच वाचणं शिकावं लागलं. पेपरमधे टी.वी. प्रोग्राम दिलेला असतो – पेपर घ्या आणि स्वतःच बघून घ्या की केव्हां टेलिकास्ट होणार आहे. जर मला वाचतां येत नसतं, तर कोणीही, ह्या कटकटीमुळे, मला सांगितलंच नसतं की एखाद्या कॉन्सर्टच्या वेळेला दुसरीकडे कडे, उदाहरणार्थ, यूरोपियन क्लबचा मैच दाखवतांत आहेत.
आणि मी, फक्त बघतंच नाही. पहिली गोष्ट, म्हणजे, मी ह्या गोष्टीकडे लक्ष देतो की गोल कोण करतोय, कोणच्या प्लेयरने किती अंक बनवलेत, आणि वर, माझी स्वतःची चैम्पियनशिप मैच सुद्धां चाललेली असते, आणि ती चक्क मोठ्या हॉलमधे चाललेली असते, अगदी टी.वी.वर दाखवल्या जात असलेल्या मैचच्या बरोबर-बरोबर. जेव्हां फुटबॉलचा मैच असतो, तेव्हां मी खोलीत बॉल ढकलतो, कॉमेन्ट्री करतो, अगदी ओज़ेरोव किंवा पेरेतूरिनसारखा; बाल्कनीचे दार – गोल, आणि ह्या दारावर लावलेला जाळीचा पडदा – गोलची जाळी असते. जर टी.वी.वर गोल होत असला, किंवा काही धोकादायक गोष्ट होत असेल, तर मी आपला खेळ थांबवतो, बघतो, नंतर गालीच्याच्या सेंटरपासून सुरुवात करतो.
“प्रतासोव लेफ्ट फ्लैन्कच्या दिशेने चालला आहे! पेनल्टी कॉर्नरमधे कैनपी करायला पाहिजे!” मल आठवतं की नेफ़्त्ची(फुटबॉल क्लब, बाकू)चे प्लेयर्स आज “द्नेप्र”च्या फुटबॉल प्लेयर्स विरुद्ध फार चुकीचं खेळताहेत, मी टाचेने चेंडू मागे मागे ढकलतो, स्वतःच स्वतःला शर्टाने पकडतो आणि जमेल तेवढं खरंखरं पडण्याचा प्रयत्न करतो. “निश्चितंच पेनल्टी, प्रिय मित्रांनो!!! पण माहीत नाही, रेफ़री फक्त एकंच पिवळं कार्ड दाखवतो...
तेवढ्यांत तोन्या आजी येते आणि माहीत नाहीं कितव्यांदा म्हणते, की बाहेर कम्पाऊण्डमधे खेळणं जास्त चांगल होईल. पण मी कम्पाऊण्डमधे सुद्धां खेळतो, आणि मला माहीत आहे की तिथे तीगोष्ट नाहीये. तिथे कॉमेन्ट्री करतां येते कां? हे खरं आहे, की लवकरंच घराच्या आतल्या ह्या चैम्पियनशिप्स बंद कराव्या लागतील, कारण की हॉकीचा सीज़न सुरू होतोय आणि चेकोस्लोवाकियाच्या टीमशी खोलीतल्या मैचमधे फेतिसोवने इतक्या जोरांत बॉल फेकली की झुम्बर फुटले. हे कारण, की आमच्या टीमकडे जिंकण्यासाठी फक्त दोनंच मिनिटं शिल्लक होती, आजोबाला मंजूर नाहीये, म्हणून मी आतां फक्त टी.वी.वरंच मैच बघतो.
हरकत नाहीं, हॉकीचा मैच नुसतां बघण्यांत सुद्धां मजा येते. त्यांत सगळे नेहमी भांडतंच असतात! विशेषकरून इण्टरनेशनल मैचेसमधे. आणि वर्ल्ड कप मैचेस, “इज़्वेस्तिया”चे पुरस्कार मैचेस, कैनेडियन कप मैचेस – हे आम्हीं तोन्या आजी बरोबर, आणि कधी कधी पणजी आजी नताशा बरोबर पण बघतो. आम्हांला रेफ़रींच्या अन्यायावर चिडायला खूप आवडतं, ज्यांना कैनेडियन्सची आणि फिन्सची चूक कधी दिसतंच नाही आणि जे नेहमी अन्यायपूर्ण पद्धतीने आमच्या खेळाडूंना आउट करतात. माझ्या आज्यांना तर इतका राग येतो की आमच्या एखाद्या खेळाडूने कधी जर नियम तोडला, तरीही त्यांना कैनेडियन्सचीच चूक दिसते, आणि जरी मला माहीतेय की आमच्या खेळाडूवर चुकीमुळेंच दंड बसला आहे, तरीही मला त्यांचे हे मत, कोण जाणे कां, बरोबर वाटते.
मग अचानक हॉकी रात्री दाखवूं लागतात. तोन्या आजी न झोपण्याचा प्रयत्न करते, म्हणजे सकाळी खेळाबद्दल मला सांगता येईल. पण तिसरा सेक्शन येतां-येतां ती नक्की झोपून जाते, म्हणून सकाळी तिला स्कोरसुद्धां माहीत नसतो, आणि टी.वी.सुद्धां रात्रभर उघडांच राहतो.
तेव्हां मी ठरवतो की मी स्वतःच मैचेस बघेन, आणि दिवसा झोपून घेत जाईन, म्हणजे रात्री माझा डोळा नाहीं लागणार. आपल्या बिछान्यावर लोळंत पडतो, कधी कधी तर दीड तास पडून राहतो, पण एका सेकंदासाठीही डोळा लागत नाहीं, मग काहीही झालं तरी हॉकीची मैच संपेपर्यंत बसूनंच राहतो. नाहीतर दुपारचं लोळणं वायाच जाईल, आणि दिवसां पलंगावर दीड घण्टा पडून राहणं – माफ़ करा, मला तरी शक्य नाहीये! पण जर सोवियत संघ आणि स्वीडनच्या टीम्समधे मैच होत असेल, तर शेवटपर्यंत कसा नाहीं बघणार? जर पहिल्या सेक्शन नंतर स्कोर 3:0 किंवा 5:1 असेल, तर, ह्याचा अर्थ हा झाला की आमची टीम निश्चितंच 10:1 ने जिंकणारे. असं, कमीत कमी नऊ वेळां झालं. एकदांतर आजोबापण रात्री उठून बसले आणि हे बघून की आम्ही कसे स्वीडन विरुद्ध लागोपाठ पाच गोल केले, गर्वाने म्हणाले:
“असा असायला पाहिजे मैच! मला सुद्धां इंटरेस्ट वाटला.”

जरा थांबामी विचार करतो, ‘तुमच्या आर्टिस्ट्सच्या कॉन्सर्टपेक्षां वाईट तर निश्चितंच नाहींये.’a

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Indian Films Marathi - 06

माझे आजोबा मोत्या , पर्तोस आणि पालनहार.... मी आणि तोन्या आजी हळू-हळू आपल्या मरीना रास्कोवाया स्ट्रीटवर परत येतोय. जेव्हां आम्हीं आम...