बुधवार, 1 नवंबर 2017

Indian Films Marathi - 01





सिर्गेइ पिरिल्याएव



इण्डियन फ़िल्म्स


मराठी भाषांतर
आ. चारुमति रामदास





जगातील सर्वांत चांगल्या, माझ्या आईला,













प्रस्तावना
जेव्हां बाल साहित्यांत एखाद्या सुयोग्य लेखकाचे आगमन होतेतेव्हां सम्पूर्ण सृष्टि ह्या अलौकिक घटनेचे स्वागत करते. कारण आपल्या ग्रहावर प्रत्येक खराखुरा बाल-लेखक सोन्या इतकाच मौल्यवान असतो. जापानमधे आपल्या जीवनांत आनंद घेऊन आलेल्या ह्या विषेश व्यक्तींना “मानवतेची दौलत” असे म्हणतात.
अशीच दौलत आहे – लेखक सिर्गेइ पिरिल्याएव, ज्याने जगाला बालपणाबद्दल एक लघु उपन्यास दिला आहे. प्रत्येक वयोगटाच्या मुलांना तो आवडेल, आणि म्हातारपणापर्यंत अनेकदा ते हा लघु उपन्यास वाचतील. कारण, त्यांत काहीतरी नक्कीच आहे, जे हसायला भाग पाडतं! बसा, पुस्तक उघडा आणि हसूं लागा. जीवनांत ह्याहून मोठा आनंद कुठे आहे कां? खरंतर हसण्याच्या भावनेचे शिक्षण – आत्म्याच्या स्वातंत्र्याचे शिक्षणंच आहे ना.
“इण्डियन फ़िल्म्स” च्या लहानग्या नायकाची आत्मा स्वतंत्र आहे – उत्साही, बेचैन, प्रामाणिक, प्रत्येकाच्या मदतीला तत्पर, ही आत्मा आहे एका कवीची, एका कलाकाराची, जी खुद्द लेखकाच्या, म्हणजे सिर्गेइ पिरिल्याएवच्या अत्यंत जवळ आहे. मला विश्वास आहे की ह्या लहानग्या नायकाची आत्मा प्रत्येक पाठकाला सुद्धां जवळचीच वाटेल. ती जगाकडे बघण्याचा एक नवीन आणि औत्सुक्यपूर्ण दृष्टिकोण उत्पन्न करेल (किंवा त्याची आठवण देईल?) ज्याची आपणा सर्वांना अत्यंत आवश्यकता आहे, विशेषकरून अशा लोकांना जे लहान मुलांसाठी लिहितात.
आपल्या रचनांतून सिर्गेइ पिरिल्याएव बाल साहित्याच्या सर्वोत्कृष्ट परंपरांना पुढे नेत आहेत, ज्यांचा उद्गम – यूरी सोत्निक, निकोलाय नोसोव, विक्टर द्रागून्स्की, ल्येव कास्सिलच्या गोष्टींपासून झालेला आहे.
वर्तमान काळांत साहित्याचा हा प्रकार क्वचितच बघायला मिळतो. कारण तो खूप अवघड आहे. आणि, मी हे सुद्धां म्हणेन, की साहित्यांत असल्या आनंदी, काही निश्चित विषय असलेल्या, ज्वलंत, आणि तसेच “जीवनाने गच्च भरलेल्या” गोष्टी म्हणजे उच्च कोटीच्या हवाई प्रात्यक्षिकांसारख्याच आहेत.
मला आनंद वाटतोय, कि आपण ज़मिनीवरून ह्या बहाद्दर पायलेटचे अचूक प्रात्यक्षिकं बघूं शकतोय, जो आपल्या आजी तोन्या वर, आजोबा मोत्यावर, पणजीआजी नताशावर, व्लादिक, ह्या मावस भावावर खूप प्रेम करतो, आणि सर्वांत जास्त त्याचे प्रेम आहे – खूप लांबच्या, ज्यांच्या पर्यंत तो पोहोचूं शकत नाहीं अशा, रहस्यमय आणि न सोडवता येणारे कोडे असलेल्या इण्डियन फ़िल्म्स वर.

मरीना मस्क्वीना       














तीन पासून अनन्तापर्यन्त










जेव्हां आम्हीं हिंडायचो...
गैस स्टेशन वर...

जेव्हां मी.....
जेव्हां मी तीन वर्षाचा होतो, तेव्हां मम्मी-पप्पाने माझ्यासाठी एक सायकल – फुलपाखरू – घेतली. तिच्यावर जायला मला खूप भीती वाटायची, कारण मला सायकल चालवायला येत नव्हते, मग पप्पांनी मागच्या चाकाच्या दोन्ही बाजूंना आणखी दोन छोटी-छोटी चाकं बसवून दिली. ती अशासाठी की मी मजेत सायकल चालवायला शिकावं. पण ह्या दोन चाकांमुळे सायकल अशी काही राक्षसासारखी झाली, कि चालवंत रहा, चालवतंच रहा, पण कुठेच जाऊ नका. आणि ह्या फिट केलेल्या चाकांमुळे मला सायकल चालवायला लाज वाटायची, कारण सगळ्यांना कळून यायचं की त्यांच्याशिवाय माझं काम चालणार नाही. मला हे सहनंच व्हायचं नाही आणि मी मम्मी-पप्पांना सांगून टाकलं की मी ह्या एक्स्ट्रा चाकांशिवायंच सायकल चालवणार.
आणि खरंच, सायकल चालवणं जरा देखील अवघड नाही झालं. मी, जणु काही सायकलवर नव्हतो जात, पण फुलपाखरांवर बसून कम्पाऊण्डमधे उडंत होतो. पण मग, असं झालं की मी टेकडीवरून खाली येत होतो, आणि अचानक माझ्या रस्त्यांत स्टॉलर घेतलेली एक बाई प्रकट झाली. मी तिला कित्तीदां ओरडून-ओरडून एका बाजूला व्हायला सांगितलं, पण, साहजिकंच आहे, तिला असं वाटलं की टेकडीच्या उंचीकडे बघतां फुलपाखरावर सवार माझ्याकडून तिला काही धोका नाहीये. म्हणून मला पट्कन टर्न घ्यावा लागला. मी सर्रकन उजवीकडे वळलो, हैण्डलवरून उडंत सायकलवरून पडलो आणि माझ्या उजवी करंगळी मुरगळली.
इमर्जेन्सी रूममधे एका सुंदर नर्सने माझी करंगळी ठीक करून दिली. मला दुःख वाटू नये म्हणून ती सतत मंद-मंद हसत होती, जसं सिनेमांत असतं:
“डोळे बंद कर आणि सहन कर, तू तर माझं शांत बाळ आहे.”
आता थोड़ं बरंसुद्धा वाटंत होतं.
चार वर्षांचा असताना मी घरांत एक मांजर आणलं. मला ते मांजर आपल्या घरांत पाळायचं होतं. पण त्याला घरांत ठेवायची परवानगी मला कोणीच दिली नाही, उलट, मांजरीला दूध पाजून हाकलायला लागले. कमीत कमी दूध तरी नसतं पाजलं, तसंच हाकलून द्यायचं, पण इथे तर दूध सुद्धां पाजलं – आणि गेट आऊट! मला इतकं अपमानास्पद वाटलं की मांजरीसोबत मी सुद्धा घरातून निघून जाण्याचा निश्चय केला, आणि, बस, फुलस्टॉप.
मी बाहेर निघून आलो.
नऊ नंबरच्या बसमधे बसलो आणि चाललो, मांजरीला सतत हातांमधे पकडून. सगळे लोकं माझ्याकडे येऊं लागले: कित्ती छान मांजर आहे, कित्ती छान मांजर आहे!
मांजर मला सारखं बोचकारंत होतं, बसने आपला राऊँड पूर्ण केला आणि परत त्याच जागे वर आली. मला खूप वैताग आला आणि मी ठरवलं की आतां पाईच घरातून निघून जाईन. मी गैस स्टेशन (पेट्रोल पम्प)चा चक्कर मारला आणि गवतांच्या मैदानातून चालंत गेलो. मांजरीला नेणं कठिण झालं होतं, कारण ती मला नुसतं बोचकारतंच नव्हती, बैलासारख्या आवाजात म्याऊँ-म्याऊँ सुद्धा करत होती. हिच्यांत येवढी हिम्मत कुठून आली?
मी सुस्तावण्यासाठी बसलो, म्हणजे थोडा वेळ तरी मांजराला हातांत पकडावं लागू नये, - मी विचार केला की ती पण थोडं हिंडून येईल. पण मी तिला सोडतांच, ती तीरासारखी पळून गेली. निश्चितंच माझं वागणं - तिच्या साठी घरांतून निघून जाणं - तिला आवडलं नसावं.                 
आणि हे कोणच्यातरी गावाच्या रस्त्यावर झालं होतं. माझं डोकं अगदीच फिरलं होतं. मी रस्त्याच्या कडेला बसलो. पाय दुखतायंत, संपूर्ण अंगावर ओरखडे आहेत, मांजर पळून गेलेली आहे – रडावसं वाटतंय. अचानक बघतो काय – एक कार इकडेच येत आहे. आणि कैबिनमधे आहे अंकल वलोद्या – हे माझ्या पप्पांचे गैरेजचे मित्र आहे. त्यांनी मला बघून हात हलवला:
“ऐ! तू इकडे कसा आलास? चल घरापर्यंत घेऊन चलतो!”
आणि, घेऊन आले. पण, तरीसुद्धां मी घरातून निघूनच जाणरेय. जर ते एका मांजराला सुद्धां ठेऊ शकत नाहीं, तर पुढे पण कसली अपेक्षा करायची?
मी पाच वर्षाचा असताना मला दहा रूबल्सची एक नोट सापडली. हे, म्हणजे खूप सारे पैसे होते, म्हणजे समजा, आजचे दहा हजार, फक्त, तेव्हाँ नोट वेगळ्या प्रकारचे होते. तर, म्हणजे, मला दहा रूबल्स सापडल्याबरोबर मोठी मुलं पट्कन धावत धावत माझ्याकडे आली. त्यातील एक म्हणाला:
“ऐक, माझे दहा रूबल्स हरवलेत!”
दुसरा मुलगा त्याला धक्का देत बोलला:
“नाहीं, माझे हरवलेत! सकाळी, मी कुत्र्याबरोबर हिंडत असताना!”
मी त्या कुत्रेवाल्या मुलाला दहा रूबल्स देणारंच होतो, पण तेवढ्यात बिल्डिंग नम्बर तीनची माझी शेजारीण, वेरोनिका आमच्याजवळ आली आणि म्हणाली:
“खोटं बोलतोय, तुझ्याकडे तर कुत्रांच नाहीये! हे ह्याचे दहा रूबल्स आहे, कारण त्याला ते रस्त्यावर पडलेले सापडलेत!”
सगळे लोक माझ्यावर ईर्ष्या करूं लागले, फक्त मला दहा रूबल्स सापडले म्हणून नाही, तर ह्यासाठी की वेरोनिकाने माझा पक्ष घेतला होता. कारण की वेरोनिका खूप सुंदर होती आणि ती माझ्याकडून बोलली होती, त्यांच्याकडून नाही. त्यानंतर मी आणि वेरोनिकाने पेट्रोल पम्प चा एक चक्कर टाकला आणि तिच्या घरी टी.वी. पण बघितला.
त्यानंतर माझ्या कम्पाऊण्डचे सगळे लोक मला चिडवायलासुद्धां लागले, की मी प्रेमांत पडलोय, पण मलातर माहीत होतं नं की ते ईर्ष्येपोटी असं करताहेत, म्हणून मी वाईट वाटून घेतलं नाहीं. आणि, समजा, मी प्रेमांत जरी पडलो असलो, तर काय? कदाचित, माझं वेरोनिकाशी लग्न सुद्धा झालं असतं, जर एक गोष्ट नसती झाली तर.
मी आमच्या बिल्डिंगच्या प्रवेशद्वाराजवळ उभा राहून सूर्यफुलाच्या बिया चघळंत होतो.
तेवढ्यांत साफ़-सफ़ाई करणारी दाशा आण्टी तेथे आली. मी पट्कन बिया लपवल्या, पण दाशा आण्टीने विचारलंच:
“बाळा, तुला माहीत आहे कां कि ह्या बिया इथे कोण कुरतडंत होतं?”
मी पण तिला सांगून टाकलं:
“दाशा आण्टी, खरं सांगू कां? तो मीच होतो.”
आता तर ती माझ्यावर अशी ओरडायला लागली, जसं तिला वेडंच लागलंय! म्हणते काय, की मी बिल्डिंगच्या प्रवेशद्वारांत पाय सुद्धां ठेवायचा नाही.
म्हणजे, वेरोनिकाच्या बिल्डिंगमधे.
दाशा आण्टी पहिल्या मजल्यावर राहते, आणि तिची खिडकी प्रवेशद्वाराच्या अगदी बाजूलांच आहे. म्हणजे, गोष्ट हाताबाहेर गेलीय. ओ गॉड, जर कुणी दाशा आण्टीला कुठलं दुसरं क्वार्टरंच दिलं असतं? कदाचित तिच्या मनांत थोडा तरी दया भाव उत्पन्न झाला असता!
जेव्हां मी सहा वर्षाचा होतो, तेव्हां पप्पांनी मला एक फुटबॉल प्रेज़ेन्ट दिली. पण ही काही साधीसुधी बॉल नव्हती, पण तीच बॉल होती ज्याने खरोखरच्या स्पार्ताकटीमचे खेळाडू प्रैक्टिस करायचे.
तुम्हीं म्हणाल, असं कसं झालं? सांगतो: माझ्या पप्पांचे एक मित्र मॉस्कोमधे राहतात आणि त्यांची बेस्कोवशी दोस्ती आहे. आणि बेस्कोव – स्पार्ताकटीमचा ट्रेनर आहे. मोठी मुलं लगेच आपल्या खेळांत मला घेऊं लागली, तेच, जे माझे दहा रूबल्स हिसकावूं पहात होते. ते मला बोलवायला माझ्या घरीसुद्धां यायचे, जणु काही मी सहा वर्षाचा नसून त्यांच्यासारखा बारा वर्षाचा आहे. मी खूश होतो, कारण आमच्या कम्पाऊण्डचा सर्वांत चांगला मुलगा, ल्योशा रास्पोपोव पण माझ्याशी हात मिळवून हैलो म्हणू लागला आणि त्याने मला लेमोनेड देखील पाजलं.
पण मग, स्पार्ताक वाली बॉल उडून एका नोकदार वस्तूला जाऊन भिडली, फाटली, आणि ल्योशाने लगेच मला लेमोनेड पाजणं बंद केलं, त्याने हात मिळवून हैलोम्हणणं सुद्धां थांबवलं. सुरुवातीला मी खूप उदास झालो, पण मग माझ्या मम्माने दाशा आण्टीला वाशिंग पावडरचा एक डबा दिला, आणि मी पुन्हां वेरोनिकाच्या बिल्डिंगमधे जाऊं लागलो.
ल्योशा रास्पोपोव आता मोठ्या मुलांबरोबर बेंचवर बसतो, आणि मी आणि वेरोनिका लाकडी रोलर-कोस्टर जवळ बसून गोष्टी करतो. मोठी मुलं पुन्हां माझा हेवा करूं लागतात, कारण की वेरोनिका नुसती सुंदरंच नाहीये, तिचा चेहरांच जणु सांगतो की मी तिला आवडतो. बस, ल्योशा रास्पोपोवला हेंच शांतपणे बघवंत नाही. मत्सरी कुठलां, आणि म्हणतात की तो कम्पाऊण्डमधे सर्वांत चांगला मुलगा आहे!
जेव्हां मी सात वर्षाचा झालो, तेव्हां शाळेत जाऊं लागलो. आमच्या टीचरचे नाव होते रीमा सिर्गेयेव्ना. तर, पहिल्याच दिवशी, पहिल्याच वर्गात, ती म्हणाली:
“आपला क्लास – एक जहाज आहे. ह्या जहाजांत बसून आपण ज्ञान-सागरांत निघालोय. कोणाला कैप्टन व्हायची इच्छा आहे कां?”
आणि ती टेबलावर ठेवलेल्या कागदांना असे आलटू-पालटू लागली, जसं की तिला नक्की माहीत आहे, की कोणाचीच जहाजाचा कैप्टन व्हायची इच्छा नाहीय. पण मला तर नेहमीच कैप्टन व्हावसं वाटायचं. ज्ञानाच्या जहाजांचातर नाहीं, पण आणखी कोणत्याही जहाजाचा कैप्टन व्हायला मला आवडलं असतं, पण, जर फक्त हेच जहाज समोर आहे तर काय करणार.
“मला व्हायचंय कैप्टन!” मी म्हटलं.
रीमा सिर्गेयेव्नाने एकदम विचारलं:
“पण, काय तू विविध प्रकारच्या अडथळ्यांच्या आणि शंका-कुशंकांच्या लाटांना तोंड देत जहाजाला एक विशिष्ट दिशेकडे नेऊं शकतोस? कारण ज्ञान-सागर – एक गंभीर, भयंकर गोष्ट आहे!                              
मला कळंत होतं की त्यांच्या मते, मी फक्त हेच नाही, तर काहीही करण्याच्या लायकीचा नाही. ती बोलत होती आणि आपल्या ओठांवर लिपस्टिक फिरवंत होती. तिथे काहीतरी चिटकलं होतं.
“ठीक आहे, रीमा सिर्गेयेव्ना,” मी आपलं घोड‌ं पुढे दामटलं, “मी तुमच्या त्या प्रश्नाचे उत्तर तर दिलेच होते नं, की लेनिनग्रादला लेनिनग्राद कां म्हणतात! कारण ग्राद’ – ह्याचा अर्थ पूर्वी शहरअसा होता! मी जहाज सुद्धा मैनेज करेन, तुम्ही काळजी करूं नका.”
“नाही, मैनेज नाही करूं शकणार,” माहीत नाही कां, पण तिने अत्यंत आनंदाने म्हटले, आणि तो मुद्दा तिथेच संपला. तिची लिपस्टिक पूर्णपणे फिस्कटली, आणि मला कळून चुकलं की मी कैप्टन नाही होणार. पण नंतर कळलं की रीमा सिर्गेयेव्ना स्वतःच कैप्टन होणार आहे. पण कोणत्याच पुस्तकांत आणि एकाही सिनेमांत कैप्टन जहाजाच्या डेकवर आपलं लिपस्टिक ठीक नाही करंत. आणि, ते सुद्धां सेलर्सच्या समोर!
जेव्हां मी आठ वर्षाचा होतो, तेव्हां मी टी.वी.ला एक पत्र लिहिलं, ज्यांत त्यांना विनंती केली होती की दॉन किहोतेबद्दल फिल्म दाखवावी. मला माहीत नव्हतं की दॉन किहोते आहे तरी कोण, पण नार्सिस अंकल कडून (हे पण माझ्या पप्पांचे एक मित्र आहेत) कळलं की दॉन किहोते बराचसा माझ्यासारखा आहे.
नार्सिस अंकलशी मी किचनमधे बोलत होतो. नार्सिस अंकल दुरुस्तीच्या कामांत पप्पांची मदत करंत होते, आणि चाकूने वॉलपेपर खरवडंत होते. ते खरवडंत होते आणि म्हणंत होते की ही भिंत सपाट आहे, आपल्या आयुष्या सारखी, आणि असं म्हणतां म्हणतां गाल्यांतल्या गालांत हसंत होते, जणु एखादी मोट्ठी ज्ञानाची गोष्ट सांगताहेत. मी पण एक छेनी (खवणी) घेतली आणि वॉल पेपर खरवडूं लागलो. माझी इच्छा होती की एकाच वेळेस जितकं जास्त जमेल, तेवढं खरवडून टाकू, पण नार्सिस अंकल म्हणाले की अशा प्रकारे वॉल पेपर खरवडतांना मी भिंतीशी तसलांच संघर्ष करतोय जसा दॉन किहोतेनी विण्ड-मिलशी केला होता.
आणि ह्याचा काय अर्थ आहे: विण्ड-मिलशी संघर्ष करणे? आणि दॉन किहोते कोण होता? हा शांत-दोन तर नाहीं ना?” मला कित्तीतरी गोष्टींमधे उत्सुकता होती.
“कम ऑन, बाळा!” अंकल नार्सिस हसूं लागले. “ शांत-दोन – ही एक नदी आहे, पण दॉन-किहोते – शिलेदार. असा कोणी नव्हतांच ज्याच्याशी तो युद्ध करेल, म्हणून त्याने विण्ड-मिलशी संअअअ...घर्ष केला” आणि नार्सिसने पेंटचा एक मोठा तुकडा काढून फेकला, पुन्हां असं म्हणंत, की भिंत आपल्या जीवनासारखीच सपाट आहे.
काही वेळाने ते पुढे सांगू लागले, मी आता काही विचारंत नव्हतो तरी:
“विण्ड-मिलशी संघर्ष करणे – ह्याचा अर्थ असा आहे, काहीच विचार न करतां आपली शक्ति व्यर्थ वाया घालवणे. तू ह्या खवणीच्या ऐवजी चाकू घे आणि निवांतपणे खरवंड. नाही तर तू दॉन किहोते सारखाच होऊन जाशील, ज्याच्यावर दुल्सेनिया तोबोसो हसली होती.”
“आता ही आणखी कोण आहे?”
“ही एक बाई होती, अशी, खासंच होती!!!” इथे अंकल नार्सिस ज्या स्टूलवर उभे होते, त्याच्यावरून पडतां-पडतां वाचले, आणि हे खास’ – ह्याच खासने त्यांना सावरायला मदत केली. त्यांनी स्वतःला सांभाळलं आणि लगेच पुढे बोलूं लागले, जसं काही झालंच नव्हतं : दॉन किहोते सतत तिच्या मागे-मागे जायचा, तिची रक्षा करण्यासाठी, पण ती त्याच्यापासून दूर पळायची, कोणी तिची रक्षा करावी, हे तिला आवडंत नव्हतं.
मग नार्सिस अंकलने मला सल्ला दिला की मी दॉन किहोते बद्दल पुस्तक वाचावं. पण मला वाचणं आवडंत नाही, म्हणून मी विचार केला, की दॉन किहोतेबद्दल फिल्म बघणं केव्हांही जास्त चांगलं होईल, आणि मी टी.वी.वाल्यांना पत्र लिहायला बसलो. चक्क चैनल नं.-1 ला.
“नमस्कार!” मी लिहिलं. “मी, वोलोग्दाहून एक स्टूडेण्ट, तुम्हांला पत्र लिहितोय. माझं नाव कन्स्तांतिन आहे. जर काही अडचण नसेल तर, दॉन किहोतेबद्दल फिल्म दाखवा. कोणत्याही दिवशी, पण खूप उशीरा नको, म्हणजे मी रात्री आरामांत झोपू शकेन. जर तुमच्याकडे ही फिल्म नसेल, तर कमीत कमी शांत-दोनबद्दलंच दाखवा, म्हणजे मला कळेल की दोघांमधे अंतर काय आहे”.
तारीख टाकली आणि सही करून दिली.
आणि, त्यांनी शांत-दोनबद्दल फिल्म दाखवली. अगदी लगेच तर नाही, पण एका वर्षाने. पण, चला, ठीक आहे, महत्वाची गोष्ट अशी की आता मला माहीत आहे की शांत-दोनकाय आहे – ही तिथे आहे, जिथे कज़ाक भांडा-भांडी करतात. पण, मग ती शांत कशी काय झाली? तार्किक दृष्टीने बघितलं, तर तिला खळखळणारी असायला पाहिजे. ऐकायला पण चांगलं वाटतंय: खळखळणारी दोन’. आणि हे जास्त प्रामाणिकसुद्धां आहे.
जेव्हां मी दहा वर्षाचा होतो, तेव्हां तिसरीत शिकंत होतो आणि आम्ही आपल्या आवडीच्या कोणत्याही विषयावर निबंध लिहायचो. मी प्रेमाबद्दल लिहिण्याचा निश्चय केला. आणि लिहून टाकला.  

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Indian Films Marathi - 06

माझे आजोबा मोत्या , पर्तोस आणि पालनहार.... मी आणि तोन्या आजी हळू-हळू आपल्या मरीना रास्कोवाया स्ट्रीटवर परत येतोय. जेव्हां आम्हीं आम...