माझे आजोबा मोत्या, पर्तोस आणि पालनहार....
मी आणि तोन्या आजी हळू-हळू
आपल्या मरीना रास्कोवाया स्ट्रीटवर परत येतोय.
जेव्हां आम्हीं आमच्या
पोर्चपर्यंत पोहोचलो, तेव्हां मी म्हटलं, “चल, पर्तोसची वाट बघूया.”
जेव्हां पासून टी.वी.वर “डी’अर्तन्यान एण्ड थ्री मस्केटीर्स” ही फिल्म दाखवली
होती, मी आजोबाला ह्याच नावाने बोलावूं लागलो. आजोबाचा चेहरा
अगदी पर्तोस सारखाच आहे आणि जर त्यावर बाजूला एक पोनीटेल बांधली, तर बिल्कुल दुसरा पर्तोसंच वाटेल! आणि तसंही आजोबांना ह्या नावाने
बोलावलेलं आवडतं. त्यांना माहीत आहे की ह्या फिल्ममधे मला पर्तोस कित्ती आवडला
होता.
“ठीक आहे, पाहूंया वाट,” तोन्याने उत्तर दिलं. “पण, फक्त आपल्या आजोबांची, पर्तोसची नाहीं.”
“अरे, ते पर्तोसंच तर आहेत!”
“त्यांना ह्या नावाने
बोलवायची काही गरज नाहीये,” आजी शांतपणे बोलतेय, पण ह्या शांतपणामुळेच कळतं की तिला किती वाईट वाटतंय – तिला वाटतं की मी
आजोबाला चिडवतोय, खरं म्हणजे चिडवण्याबद्दल मी विचारसुद्धां
करत नाहीं. “ते काल मला सांगत होते की इलीच आला होता, त्यांचा
खूप जुना मित्र, आणि तू सरळ इलीचच्या समोरंच आजोबाला पर्तोस
म्हटलं...आजोबा एवढ्या मोठ्या हुद्द्यावर आहेत, इतक्या
लोकांना ओळखतात...आणि ते आपले पालनहार सुद्धा आहेत, पर्तोस
नाही.”
“हे पालनहार म्हणजे काय
असतं?”
मी विचारतो.
“ते आपल्या खाण्यापिण्याची
व्यवस्था करतात. मी ती ‘सर्कस’ कार
तुझ्यासाठी विकत घेतली. नऊ रूबल्सची आहे, आणि मला पैसे कोणी
दिले, काय वाटतं, आजोबाने नाही,
तर कोणी दिले?”
आणि तेवढ्यांत आजोबा
दिसतांत.
जुना कत्थई सूट घातलेले, जैकेट उघडं आहे,
कारण पोटावर बसंत नसेल; डोक्यावर फिक्कट पिवळी
कैप नव्हती, आणि आजोबांचे उरले-सुरले भुरे केस हवेत उडंत
होते; घाणेरडे, कदाचित सूटापेक्षांही
जास्त जुने जोडे घातलेले आजोबा येत आहेत; चेहरा हसरा
(त्यांने दुरूनंच मला आणि आजीला बघितलं होतं), ते बहुधा,
जवळ-जवळ सगळ्याच लोकांना बघून, जे ह्यावेळी कम्पाऊण्डमधे
आहेत आणि आजोबाला नमस्कार करताहेत, मंद मंद हसताहेत.
आणि मला अचानक इतका आनंद
होतो,
की माझे आजोबा येताहेत, आणि आता आम्हीं घरी जाणार,
आणि, कदाचित व्लादिक येईल, आणि आजोबा आमच्याबरोबर पत्त्यांचा खेळ ‘झब्बू’ खेळतील! म्हणजे असं, की मी सम्पूर्ण कम्पाऊण्डमधे
पळत सुटतो आणि जोराने ओरडतो:
“आ-जो-बा!!!
पा-आ-लन-हार!!! पा-आ-आ-लनहार!!!!”
कम्पाऊण्डमधे असलेले सगळे
लोकं वळून बघतांत; मी उडी मारून आजोबांच्या खांद्यावर
चढून जातो, आणि ते फक्त येवढंच पुन्हां पुन्हां म्हणतांत:
“अरे, हल्ला कां करतोस? लोकं आहेत!
लोकं आहेत! कां ओरडतोयस?!” (आजोबा, माहीत
नाही कां, “हल्ला कां करतोयस”च म्हणतात, ते “किंचाळतो” किंवा डरकाळ्या फोडतो” सुद्धां म्हणू शकतांत.)
मग, जेव्हां आम्हीं जीना चढतो, तेव्हां आजी आजोबाला
समजावते, की तिनेच मला असं सांगितलंय की आजोबा पालनहार आहेत,
पर्तोस नाहींत, पण आजोबा आपल्यांच स्टाइलमधे
क्वैक-क्वैक करतांत, की “आजीला काही काम-धाम नाहीये”.
आणि सकाळी तर, आह सकाळी! शेवटी ते घडतंच, ज्याची मी केव्हांपासून
वाट बघतोय, म्हणजे, ज्याचं खूप आधी
आजोबानी प्रॉमिस केलं होतं.
आजोबा सकाळी सहा वाजता मला
उठवतांत आणि विचारतांत की त्यांच्या बरोबर ऑफ़िसला यायचंय कां, किंवा अजून काही वेळ झोपायचंय? अफकोर्स, मला जायचंच आहे, तसंही, जेव्हां
आजोबा ऑफिसला जाण्यासाठी तयार होत असतांत, तेव्हां मी उठूनंच
जातो, ते मला आपल्या बरोबर नेतील किंवा नाहीं ह्याचा विचार न
करतां. आणि आता तर – ओहो! मी बिछन्यातून उठंत नाहीं, उडीच
मारतो आणि तीनंच मिनिटांत किचनमधे बसून जातो, कारण की मला
आजोबाला दाखवायचं आहे की जेव्हां वेळ येईल आणि मला रोज ऑफिसमधे जावं लागेल,
तेव्हां मी व्यवस्थित सगळं करेन, काहीच गडबड न
करता.
आमच्या लोकल स्मोलेन्स्क
रेडिओचे प्रोग्राम लागोपाठ चालतंच असतांत, जसं “धान्य
पर्याप्त होईल”, “मुलं पूर्वीपेक्षां जास्त चांगल्या प्रकारे
विश्रांति घेतांत”; फ्राय पैनवर लोणी तडतडतंय आणि इकडे तिकडे
उडतंय; फ्रिजमधून सगळ्या वस्तू बाहेर काढल्या आहेत, कारण आजीला वाटतं की आम्हीं कदाचित आधी नाही म्हटलेला एखादा पदार्थसुद्धां
खाऊं शकतो (जरी तिला माहीत असलं, की आमची 13नंबरची बस पंधरा
मिनिटांनी सुटणार आहे), हे मी आणि आजोबा ब्रेकफास्ट करतोय.
मला आश्चर्य वाटतं की आजी ह्या फ्राय पैनवर सगळंच कसं करूं शकते, जेव्हां तेथून चारीकडे आणि तिच्या हातांवरसुद्धां गरम लोणी उडतंय, आणि ती असं दाखवंतसुद्धां नाही की तिला भीति वाटतेय, किंवा दुखतंय, आणि मग मी फ्राइड अण्डा खातो, बिल्कुल आजोबांसारखाच – जसे ते अण्ड्याचा पिवळा भाग पसरतात, आणि नंतर ब्लैक-ब्रेडच्या तुकड्याने प्लेटमधे एकत्र करतांत.
आणि बसमधे, आणि ट्राममधे आजोबा आपल्या परिचित लोकांशी भेटतांना माझ्याकडे बोट दाखवून
सगळ्यांना सांगतात: “हा आमचा लहाना...”
एकीकडे तर मला
फार्मास्यूटिकल गोडाउन खूप घाणेरडं, अस्तव्यस्त आणि
जर्जर वाटतं, पण दुसरीकडे असंही वाटतं की हीच अस्ताव्यस्तता,
इकडे-तिकडे विखुरलेल्या इंजेक्शनच्या लहान-लहान बाटल्या, बोळे, कागद आणि सगळ्या प्रकारचा कचरा, ह्यामुळेंच तुम्ही विचार करूं शकतां की फार्म्यास्यूटिकल-गोडाउनमधे गंभीर
प्रकाराचं काम होत असतं...
काही जरूरी फोन केल्यावर, आजोबा मला आपल्याबरोबर नेतात, हे बघायचं असतं की
ट्रक्स व्यवस्थितपणे चालले तर आहेत नं. मजूर कोण्या इवानची
वाट पहाताहेत, जो असल्याशिवाय काम सुरूं नाहीं करता येत,
आणि जेव्हां आजोबाला कळतं की इवान अजून आलेला नाहीये, ते आपल्या हाताखालच्या लोकांना समजावतांत की हा इवान खरं म्हणजे कोण आहे.
ते अश्या शब्दांमधे समजावतांत, ज्यांची मला त्यांच्याकडून
जरा सुद्धां अपेक्षा नव्हती. पण पहिली गोष्टं, मजूर तयार
होतात, आणि दुसरी, मला स्वतःला सुद्धां
आवडतं की माझे आजोबा असे शब्दसुद्धां वापरू शकतात. मी तर, खरं
म्हणजे, खूप आधीपासून त्यांना ओळखतो.
आणि शेवटी, जेव्हां फार्म्यास्यूटिकल-गोडाउनमधे बसल्या-बसल्या मी थकून जातो, तेव्हां ह्या गोडाउनचे डाइरेक्टर, म्हणजे माझे आजोबा,
मला ट्राममधे बसवून घरी पाठवतांत. त्यांत काय आहे? “जुबिली” स्टॉपपर्यंत जाईन, आणि तेथून पाच मिनिट
चालंत जाईन – बस, मी घरी पोहोचून जाईन...
पुन्हां
पणजीआजी नताशा आणि फाइनल...
हे तेंच 1986 आहे, माझ्या जीवनांतील तोच महत्वपूर्ण फुटबॉल मैच – वर्ल्ड चैम्पियनशिप-मैच,
जेव्हां मरादोनाने हातानी ‘गोल’ बनवला होता आणि सगळ्या रेफरीज़ने त्याला हे स्वीकार करंत माफ़ केलं होतं की
हा देवाचा हात आहे; ही तीच चैम्पियनशिप होती, ज्यांत प्लेटिनीने सेमिफाइनलमधे निर्णायक पेनल्टी ठोकून दिली होती,
- तोच, तोच!...स्पष्टंच आहे की मी लागोपाठ
सगळेच मैचेज़ बघतो, संपूर्ण महिनाभर टी.वी.पासून दूर नाही
हलंत. खोलीतल्या माझ्या मैचेज़ला पण पुढे सरकावून टाकतो, आणि
जेव्हां फ़ाइनल होईल, तेव्हां मी अगदी हिरवा स्क्रीन होऊन
जाईन आणि स्टेडियममधे असलेल्या फैन्सबरोबर ओरडेन!
आणि, आजी, ही आहे, खरोखरची सेन्ट
जॉर्ज डे ची फ़ीस्ट!
टी.वी. चालू करतो, अगदी शानमधे, बिल्कुल आजोबासारखा, खुर्चीत बसतो, तिला टी.वी.जवळ सरकवतो, अशा प्रकारे की खुर्ची आणि चमचम करणारा हिरवा स्क्रीन, ज्याच्यावर छोटे-छोटे लोक धावतात आहे, एकमेकांपासून
फक्त दीड मीटर दूर असेल. आणि काय?
कॉमेन्टेटर बोलायला सुरुवात
करतो,
आणि खोलीत चुपचाप माझी पणजी आजी नताशा घुसते.
आज तिचा मूड बरोबर नाहीये –
हे मला असं कळलं, की तिचा नेहमीचा व्यवस्थित
बांधलेला डोक्यावरचा रुमाल आज सरकलेला आहे, आणि ओठ एक डेंजरस
त्रिकोण बनवतांहेत. वरून ती काही तरी सुडसुडसुद्धा करतेय; म्हणजेच
– संकटाची वाट बघा.
“अरे,” नताशा म्हणते, “चल, टी.वी.ला
थोडा आराम करूं दे!”
मला चांगलंच कळतंय की ह्या
“टी.वी.ला थोडा आराम करू दे”चा अर्थ माझ्यासाठी काय असतो! मी महिन्याभरा पासून
ह्या फायनलची वाट बघत होतो, आणि सकाळ झालीये, झोपूं शकत नाही, आणि अशा प्रसंगावर तर मी रात्रीसुद्धां
नाही झोपंत, - आणि हे अचानक “चल...” सांगा आता!
“पण हा तर,” मला इतका राग आला की माझ्या सगळ्या नसा तडतडूं लागल्या, “फायनल मैच आहे! मरादोना खेळणारे, तिगाना, प्लातिनी, रोझ्तो...”
जेवढ्यांना मी ओळखंत होतो, त्या सगळ्यांची नावं मी सांगितली, पण नताशानी ठामपणे
टी.वी.बंद करून टाकला, आणि मग पुढे असं झालं: ती –
स्टैण्डच्या जवळ उभी राहून त्या दुर्दैवी बॉक्सला वाचवतेय, आणि
मी तिला ढकलतो आणि टी.वी. पुन्हां चालू करतो. असं बरेचदां झालं: मी चालू करतो,
ती बंद करते – आणि मग स्टैण्डजवळ आमची दंगल सुरूं झाली. वरून,
नताशाला तर जणु मजाच वाटंत होती, आणि मी मात्र
रागाने पेटंत होतो. फक्तं अशासाठी नाही की फ़ायनल मैच होता, तर
अशासाठी की मला टी.वी. न पाहूं देणं इतकं सोपं आहे. नताशा जितकी आक्रामक होत होती,
तेवढांच मी सुद्धां वैतागंत होतो, आणि माझ्या
एका जोरदार धक्क्याने पणजी आजी हळू हळू सोफ्यावर पडू लागली, तिचे
डोळे हळू-हळू गोल-गोल फिरूं लागले, आणि ती चित झाली, तिचा उजवा हात निर्जीवपणे एकीकडे लटकला. बस, सत्यानाश...फायनल
बद्दल मी, खरंच, विसरूनंच गेलो,
नताशाला कृत्रिम श्वास देण्याचा प्रयत्न करतो, जसं मला व्लादिकने शिकवलं होतं, पण काहीच उपयोग होत
नाहीये...
पोलिसांत फोन करूं का, की मी पणजीआजीला मारून टाकलंय?
शरीरांत – हृदयाच्या जवळ
“गार” वाटूं लागलं, आणि ह्या “गारठ्यामुळे” माझे
दातसुद्धां किटकिट करूं लागतात; आणि तेवढ्यांत दाराच्या
मागून पैकेट्सची सर् सर् ऐकूं येते – ही तोन्या आजी आलीये, डिपार्टमेन्टल
स्टोअरमधून, तिला मी काय सांगणारेय?
पण मी काही म्हणायच्या
आधीच तोनेच्का आनंदाने आत येते आणि सांगते, की तिने
कण्डेन्स्ड मिल्कचे तब्बल तीन डबे आणले आहेत आणि ती त्यांना आटवून पेढे बनवणारेय,
जे मला बासुंदीपेक्षां जास्त आवडतात.
“फक्त येवढं कळंत नाहीये, की सगळे डबे एकदमच आटवू की आधी दोन आटवून मग तिसरा आटवूं?”
मी आपराधिक भावनेने हे
सांगण्यासाठी तोंड उघडलंच होतं, की दुधासाठी थैन्क्यू,
पण मी चुकून नताशेन्काला मारून टाकलं आहे; नताशेन्का
आपली पोज़ न बदलतां, जोरांत, पूर्ण
फॉर्ममधे, थांबून-थांबून म्हणते:
“दोनंच उकंळ – आटंव, तीन डब्यांनी जास्त चिक्कट होतील!”
जिवन्त आहे! “गारठा”
वितळूं लागतो, दातांची किटकिट थांबली; फायनलची
आठवण येते, आणि पेढ्यांच्या कल्पनेने तर मला आनंदाच्या
उकळ्याच फुटू लागतांत. नताशा बडबडंत उठली की ती प्योत्र इवानोविचकडे चालली आहे (ती
टॉयलेटला प्योत्र इवानोविच म्हणते) आणि खोलीतूंन निघून गेली, जणु काही झालंच नव्हतं...(येवढं फक्त मला घाबरवण्यासाठीच सहन केलं होतं!)
मी ठरवलं की नताशाची गोष्ट
कुणालांच नाही सांगणार, मी आणि तोन्या आजी फायनलचा शेवट
बघतो, आजी पेनाल्टीला “पेनाल्चिक” म्हणते आणि मी कितीही
समजावलं, की असा कोणताच शब्द नाहीये, फक्त
“पेनाल्टी” आहे, तरी ती समजतंच नाही, “पेनाल्चिक
कशाला”.
संध्याकाळी चहा पिताना, इतर गोष्टींबरोबरच, मी नताशाशी झालेल्या भांडणाबद्दल
सांगतो. आजोबा क्वैक-क्वैक करंत म्हणतात, की “एक म्हातारी
कशी पोट्ट्याला वेडं करूं शकते”, आणि मग ते ‘न्यूज़’ येईपर्यंत (म्हणजे, प्रोग्राम
‘व्रेम्या’ सुरू होई पर्यंत) ‘फोर्श्माक’ (खीमा – अनु.) (एक पक्वान्न, जे आजोबाला बनवतां येतं, आणि जे बनवणं त्यांना आवडतं), तयार करून ठेवतील,
म्हणजे आम्हांला किचनमधून बाहेर निघायला पाहिजे.
पण मी नाही जात, उलट आजोबांना म्हणतो की न्यूज़च्या नंतर आपण पत्ते खेळूं. आणि जर त्यांना
वाटलं, तर ते मला ‘प्रेफेरान्स’
खेळणं शिकवूं शकतात. हे मस्तंच होईल! नाहीं तर जेव्हां आमचे सगळे
आजोबा (माझे आणि व्लादिकचे) खेळायला सुरुवात करतात, आणि
त्यांच्यासोबत व्लादिक आणि त्याचे पप्पा पण खेळतात, तेव्हां
मला कळतंच नाही की काय करावं. पण आता, कदाचित्, जेव्हां मी शिकून घेईन, तेव्हां मी पण सहजपणे खेळू
शकेन.
उपसंहार
...मी
आणि तोन्या आजी संध्याकाळी उशीरा, जवळ-जवळ रात्रीच समर कॉटेजमधून परत येत आहोत. जूनचा
महिना आहे. अंधार होऊं लागला आहे, जरी ह्या काळांत सर्वांत मोठे दिवस असले तरी. दुर्गंध
सोडणारी नदी पार करून टेकडीवरून खाली उतरतो आणि बघतो काय, की
आम्हांला भेटायला आजोबा येत आहेत, ते घरी नाहीं थांबू शकले,
कारण की त्यांना काळजी वाटंत होती: न्यूज़
प्रोग्राम ‘व्रेम्या’मधे घोषणा केली होती,
की सर्वांत भयंकर वादळ येणार आहे.
आजोबा कितीदांतरी म्हणाले, की आम्हांला वेड लागलं आहे,
नाहीतर अकरा वाजेपर्यंत बगिचांत नसतो
बसलो, आणि आजी त्यांना उत्तर देणारंच होती,
की तेवढ्यांत ते वादळ आलंच. विजांचा कडकडाट,
घोंघावणारे वारे, सगळ्या
वस्तु थरथरंत होत्या, आणि मला भीति वाटंत होती आणि आनंदही होत होता, आणि
एका सेकंदातंच आमच्या अंगावरचे सगळे कपडे चिंब झालेले होते.
मिलिट्री
एरियाच्या अरुंद पायवाटांवरून आम्हीं एका झुण्डांत धावतो; तोन्या
आजी आणि आजोबा खो खो हसताहेत, हे बघून की मी कसा आपले सैण्डल्स आणि मोजे काढून
पाण्याच्या डबक्यांत छपछप करतोय. मला पण त्यांना हसवणं आवडतं: मी डान्स करूं लागतो, आणि
जोरजोरांत “डिस्को डान्सर” मधलं माझं आवडतं गाणं म्हणूं लागतो: “गोरों की ना कालों की-ई-ई! दुनिया है दिलवालों
की. ना सोना-आ! ना चांदी-ई! गीतोंसे-ए, हम को प्या-आ-आ-र!!!” (गाण्याचा अर्थ असा आहे – खायला
प्यायला आमच्याकडे पुरेसे पैसे नसूं देत,
पण स्वातंत्र्य आणि गाणं – हीच माझी
दौलत आहे). जेव्हां आम्हीं आपल्या कम्पाऊण्डमधे पोहोंचतो, तरीही
मी गातंच असतो, पण इतक्या जोरदार आवाजांत की शेजारी-पाजारी
खिडक्यांमधून पाहूं लागतात; पण मला काही फरक पडंत नाही – उलट आणखी जास्त गाण्याची
आणि डान्स करण्याची इच्छा होऊं लागते.
घरी
गेल्यावर आम्हीं यूडीकलोनने आंघोळ करूं,
म्हणजे नंतर आजारी नाही पडणार, मग
आम्ही पैनकेक्स खाऊं, पणजीआजी नताशाने सकाळीच पेनकेक्स बनवण्याचं प्रॉमिस
केलं होतं, आणि उद्या आहे सण्डे,
व्लादिक येईल आणि आम्हीं
अभ्यासाव्यतिरिक्त आणखी एखाद्या आयडियाबद्दल विचार करूं, जसं
बुटक्यांचा बिज़नेस करणं किंवा एखादी कादम्बरी लिहिणं...
काही
महिन्यांनी मी नेहमीसाठी स्मोलेन्स्क सोडून निघून जाईन,
जिथे हे सगळं, तुम्हांला
सांगितलेलं, झालं होतं. एका नवीन जीवनाचा आरंभ होईल, नवीन
हीरोज़सोबत, नवीन एडवेन्चर्स बरोबर,
ज्यांच्याबद्दल मी इथे काहींच
सांगणार नाही, कारण त्याच्यासाठी वेगळ्या पुस्तकाची गरज आहे. कदाचित्, ते
जास्त गंभीर, जास्त दुखी असेल...आणि हे पुस्तंक, जर
तुम्हांला हसवणारं, आनंद देणारं जमलं असेल,
तर ह्याला इथेच संपवणं जास्त चांगलं
आहे. मला विश्वास आहे, की पुन्हां असा काळ येईल जेव्हां आम्हीं आनंदाने
बागडंत सिनेमा थियेटर्समधे जाऊं आणि इण्डीयन फिल्म्स बघूं. तेव्हां मी नवीन
एक्टर्सवर पण तेवढंच प्रेम करूं शकेन, जसं मी मिथुन चक्रवर्तीवर आणि अमिताभ बच्चनवर केलंय, आणि
पुन्हां पावसांत अनवाणी पायांने डान्स करतांना इण्डियन गाणी म्हणेन, शेजारी
आपाआपल्या खिडक्यांमधून आश्चर्याने बघताहेत,
बघूं देत आणि आश्चर्य करूं देत –
अगदी तसंच, जसं कित्येक वर्षांपूर्वी झालं होतं...
परिशिष्ट
आन्या आण्टी आणि इतर लोकं...
(माझ्या
बिल्डिंगच्या काही लोकांबद्दल)
आमच्या
मजल्यावर आन्या आण्टी राहते, तिला मी आणि मम्मा माहीत नाहीं कां, शेपिलोवा
म्हणूनंच बोलावतो. शेपिलोवा तिचे आडनाव आहे. हे आडनाव तिच्यावर अगदी चपखल बसतं, ते
ह्या चांगल्या बाईच्या चांगुलपणाला व्यवस्थित प्रकट करतं.
तर, ती
खूप फास्ट आणि चतुर आहे, उँची जवळ-जवळ एकशे सत्तावन से.मी. होती (तिने स्वतःच
सांगितलं होतं), ती खूपंच रोड होती;
चंचल,
तीक्ष्ण,
उत्सुक डोळे आणि बारीक असले तरी खूप
मजबूत हात होते तिचे. हात तर तिचे खरंच खूप मजबूत होते, कारण
की ती रोज खूप लांबून खाण्यापिण्याचे सामान आणि भाजी पाल्याने भरलेल्या, आणि
देव जाणे आणखीही काही काही वस्तूंनी भरलेल्या मोठ्या मोठ्या पिशव्या आणायची. हे सगळं कोणकोणत्या आण्टीज़साठी आणि
अंकल्ससाठी, आजोबांसाठी आणि आजींसाठी असायचं ज्यांना ती ओळखायची, किंवा
फक्त ओळखीच्या लोकांसाठीसुद्धां असायचं. आन्या आण्टी त्यांना मदत करते, कारण, ते
“कठिण परिस्थितीत जगताहेत”.
तसं
मी आणि मम्मा तर कठीण परिस्थितीत नाहीं जगंत,
पण शेपिलोवाच्या मते आम्हांला सुद्धां
मदतीची गरज आहे, कारण की आम्हीं सारखं काम करतो. आणि ती आमच्यासाठी
बाजारातूंन भाजी पाला, फळं आणि अशी प्रत्येक वस्तू घेऊन येते, ज्याची
तिच्या मताप्रमाणे आम्हांला गरज असते. पैशे आम्हीं देतोच, पण
मी सारखा विचार करतो की मी स्वतःसुद्धां,
बरेंचदा बाजारात जाऊन काकडी आणि
टॉमेटो आणू शकतो. पण आन्या आण्टीचं मत वेगळंच आहे:
‘रचनात्मक प्रक्रियेसाठी सम्पूर्ण समर्पणाची आणि आंतरिक
शक्तींना एकाग्र करण्याची खूप गरज आहे!’
म्हणजे, आमच्या
शेजारणीला असं वाटतं की जर मी दिवसाचा थोडा अंश गोष्ट किंवा लघु उपन्यास
लिहिण्यांत घालवतो, तर उरलेल्या वेळांत टॉमेटो विकत घेण्यांत काहीच अर्थ
नाहीये. मी तिच्याशी वाद घालायचो, पण तो फुकटंच असायचा. आन्या आण्टी हट्टी आहे, अगदी
लोखण्डासारखी. तिला वाकवणं शक्यंच नाहीये. आणि ती नेहमी आपलंच खरं करते, कोणत्याही
परिस्थितीत.
आतां
उदाहरणंच द्यायचं तर हे बघा. काही दिवसांपूर्वी मम्माने आन्या आण्टीला म्हटलं की
काही गरम जैकेट्स आणि आणखी काही सामान आपल्या अश्या परिचितांसाठी घेऊन जा, जे
खूप धनाढ्य नाहीयेत, ज्यांना त्याचा उपयोग होईल (तुम्हांला तर माहीतंच आहे
की शेपिलोवाची कित्ती तरी लोकांशी ओळख आहे). पण स्वतः आन्या आण्टीलाच ते राखाडी
रंगाचं जैकेट खूपंच आवडलं. तिने ठरवलं की ते जैकेट स्वतःसाठीच ठेवायचं. आणि
रविवारी सकाळी, जवळ-जवळ साडे आठ वाजतां,
आम्हीं झोपेतंच असतांना दारावरची बेल
वाजते.
“तानेच्का, ही
मी आहे,” दाराच्या मागून शेपिलोवा ओरडते.
माझी
मम्मा, जिचं नाव तान्या आहे,
दार उघडते.
“मी
तुम्हांला उठवलं तर नाहीं नं?! नाहीं! मी आत्तांच बाजारांतून आलेय, हे
घ्या काकड्या, टॉमेटो, संत्री, एपल्स, आंबट कैबेज! ठेऊन घ्या. आणि ते, राखाडी
जैकेट, मी स्वतःसाठी ठेवायचं म्हणतेय, चालेल? मी
त्याच्यासाठी तुम्हांला पैसे देणारेय. नक्कीच देणार,
कारण की ते लोकरीचं आहे, महागडं
आणि मस्तं आहे!”
आणि
काही बोलायची उसंत न देता एक हजार रूबल्स पुढे केले,
त्या जुन्या जैकेटसाठी, ज्याची
मम्माला काहींच गरज नव्हती, आणि त्याच्यासाठी शेपिलोवाकडून पैसे घेणं चूकंच झालं
असतं.
“कसले
पैसे!” मम्माला पण राग आला. “आन्या! असा विचार पण करूं नकोस! मी असंच सगळं देऊन
टाकलं होतं, त्या एकदम निरुपयोगी वस्तू आहेत!”
“पण
जैकेट तर सुरेख आहे!” आन्या आण्टीने आवाज़ चढवंत म्हटलं,
तिला वाईट वाटलं होतं, आणि
ती वाद घालू लागली. “कमीत कमी पाचशे तरी घ्या!”
“नाहीं!”
“तीनशे!”
“नाही!”
माझी मम्मा ह्या हल्ल्याने गडबडून गेली.
“एकशे
घेऊन घ्या, प्लीज़!”
“बस, आन्याआण्टी,” मी मधेच टपकलो. “इथून जा,
प्लीज़. थैंक्यू वेरी मच.”
निराश
होऊन ती दाराकडे जाते, पण लैच फिरवायच्या आधी वळून सांगते:
“हरकत
नाहीं. मी आणखी काही विचार करीन.” आणि तिने विचारमग्न होऊन डोकं हलवलं.
सोमवारी
संध्याकाळी एक मोठ्ठा, कदाचित एक लिटरचा,
लाल कैवियरचा (स्टर्जन माशाच्या
अण्डाच्या एक पदार्थ) डब्बा घेऊन येते,
आणि धमकी देतं पैसे नाहीं घेत की
अश्याने आपली दोस्ती संपेल. ह्या कैवियरची किंमत,
माझ्या मते एक हज़ारापेक्षां जास्तंच
असेल. आन्या आण्टीने आपलं म्हणणं खरं केलंच,
आणि तुम्हीं समजलेच असाल की तिने
जैकेटची किंमत चुकवली...
आन्या
आण्टीकडे आपण पुन्हां जरूर येऊं, कारण ती आमची खूप जवळची शेजारीण आहे, असं
म्हणूं शकतो, आणि शिवाय ह्या गोष्टीची मुख्य हीरोइन आहे. पण आधी
आणखी काही हीरोज़ला भेटूं या.
तिसर्या
मजल्याचा यारोस्लाव. ओह, हा आजकालच्या हाउसिंग सोसाइटीज़च्या तरुणांचा ज्वलंत
प्रतिनिधी आहे. रोमा ज़्वेरने कदाचित आपलं गीत “स्ट्रीट्स-अपार्टमेन्ट्स” कदाचित
रशियन स्ट्रीट्स आणि अपार्टमेन्ट्सच्या अश्याच लोकांसाठी लिहिलं आहे...
यारोस्लाव
– ईडियट आहे. काम-धाम नसलेला तरूण, ढीग भर खतरनाक आणि,
मी तर म्हणेन, अत्यंत
खतरनाक सवयी आहेत त्याला, सदा खूष असतो,
भांडकुदाळ आणि आपल्या कधी लहान, तर
कधी लांब केसांना इंद्रधनुष्याच्या वेगवेगळ्या रंगांत रंगतो. तो तसल्याच
प्रकारच्या तरूण मुलं आणि मुलींच्या ग्रुपचा सदस्य आहे,
त्यांच्यातील काही जणं आमच्या, आणि
काही शेजार-पाजारच्या बिल्डिंग्समधे राहतात,
आणि हा ग्रुप नेहमी रात्री दहाच्या
नंतर आमच्या मजल्यावरच्या गार्बेज-पाइपजवळ जमा होतो. असं वाटतं की यारोस्लाव आणि त्याच्या मित्रांचा काही विशिष्ट
वर्तुळांत चांगलाच दबदबा आहे, कारण, मॉस्कोच्या विभिन्न भागांतले लोकं बरेचदां, सग़ळ्यांसाठी
साडेसाती म्हणून आमच्या बिल्डिंगमधे येऊन धडकायचे,
फक्त वेळ चांगला घालवायला.
रात्री
दोन पर्यंत बिल्डिंगमधे हल्ला-गुल्ला चाललेला असतो,
हसण्याचे आणि ओरडण्याचे आवाज़ ऐकू
येतात. तरूण मुलं आणि मुली जीवनाच्या प्रवाहांत वाहवंत जातात. बिल्डिंगमधे राहणारे, ज्यांत
मी पण होतो, सुरुवातीला तर शांततेसाठी त्यांच्याशी भांडायचा
प्रयत्न करायचे, पण नंतर थांबूनच गेले. पहिली गोष्ट, म्हणजे
– हे व्यर्थच होतं, आणि दुसरी, कारण की, यारोस्लाव आणि त्याचे मित्र फक्त ओरडणारे आणि
खिडक्यांचे काच फोडणारे डाकू-बदमाशंच नव्हते. म्हणजे,
खिडक्यांचे काच ते फोडायचेच, आणि
आमचा मजल्यावरचा काच कित्तीदां बेदम मार खाऊन तडकून फुटलेला आहे, पण
आश्चर्याची गोष्ट ही आहे, की नंतर यारोस्लाव आणि त्याचा खास मित्र वाल्या
च्योर्नी न विसरतां नवीन काच फिट करून द्यायचे. शिवाय,
आपल्या बैठकीनंतर यारोस्लाव सकाळी
केरसुणी घेऊन गार्बेज-पाइपच्या जवळची जागा व्यवस्थित स्वच्छ करून टाकायचा. आणि
काही दिवसांपूर्वी तर ह्याचं उलटंच घडलं: रात्रभर धिंगाणा घातल्यावर, आनंदाने
आणि उत्तेजनेने बेफाम झालेल्या ह्या तरुणांना शांत करायला आलेल्या लोकांबरोबर
बाचाबाची झाल्यावर, यारोस्लावने सकाळी-सकाळी बाहेर येऊन बिल्डिंगच्या
प्रवेश द्वाराजवळच्या खिडकीवर बियरचा डबा,
किंवा असली कोणतीही वस्तू न ठेवतां
कुंडीत लावलेलं एक खरोखरचं फूल ठेवलं! हे खरोखरंच “धूल का फूल” होतं!
फूल
विचित्र तर होतंच, आणि यारोस्लावने त्याला कुठून शोधून आणलं – माहीत
नाहीं. ते एक मद्दडसं, कदाचित मरगळलेलं फूल होतं,
किंवा त्याला कोणी चावून टाकलं होतं, जुन्या
कुंडीत लावलेलं होतं, पण अगदी ताज़ं होतं आणि उमललं होतं, कुठेही
लक्ष न देतां. उमललं होतं! जेव्हां मी एकदा बघितलं की यारोस्लाव फुलाच्या
रोपट्याला पाणीसुद्धां घालतोय, तर मला बिल्कुल राग नाहीं आला. खरंय, सौंदर्याला
पण कुठल्या कचराकुंडीत आपला विसावा सापडतो!
मी
आणि यारोस्लाव एकमेकाला फक्त ‘हैलो’च म्हणतो, ह्याने आमच्यातील संवाद सीमित होऊन जातो. त्यावेळेस मी
त्याला फुलाबद्दल म्हटलं होतं, की, फक्त तोच ह्या बिल्डिंगला असं करून टाकतो, की
आंत घुसायला सुद्धां भीति वाटते, आणि मग तिथे फूल लावतो,
पण यारोस्लाव हसंत-हसंत,
ओरडंत, खूप अर्थपूर्ण आवाजांत म्हणाला: “बिज़ पालेवा” – बस असं
झालंय. (एका लोकप्रिय गीताचे शब्द, ह्या
शब्दांचा अर्थ आहे – गवगवा न करता). ह्या शब्दांचा काय अर्थ आहे, मला कळलं नाहीं, पण, मी खरंच सांगतोय, की थोडा वेळ मी त्यांचा
खरा अर्थ शोधंत होतो...
कधी कधी असंही होतं, की बिल्डिंगमधे शांतता आहे, आणि शेपिलोवासुद्धां काही
आणतं नाहीये आणि काही सल्लाही देत नाहीये. तेव्हां, कदाचित, अचानकंच फोन वाजूं लागतो. आणि जसांच तुम्हीं रिसीवर
उचलता, त्यांतून एक उत्तेजित,
दणकट,
जणु कुठे कमीत कमी आग तरी लागलीये, एका
बाईचा कर्कश स्वर बोलतो:
“तर!
(विराम) तर! तर!”
ही
प्रकट होतेय माझी आणखी एक हीरोइन, जिचं नाव तुम्हांला लवकरंच कळेल.
“हैलो,” तुम्हीं म्हणता,
“कोण बोलतंय?”
काहीच
प्रतिक्रिया नाही, उलट – माझ्या प्रश्नालाच प्रश्नार्थक उत्तर मिळतं.
“मी
कोणाशी बोलतेय? कोण आहांत आपण?
मी कोणच्या नंबरवर आले?!”
“तुम्हांला
कोण पाहिजे?” मी विचारतो.
पुन्हां
कोणतीच प्रतिक्रिया नाही. रिसीवर ठेवून द्यावासा वाटतो,
पण त्यांतून पुन्हां जोरदार, त्रस्त
आवाजांत विचारतांत:
“हा, तान्याचा
मुलगा आहे कां?! सिर्गेई?!”
“हो, मीच
आहे,” मी उत्तर देतो.
“एपल्स!!!”
रिसीवर जोराने ओरडतो.
कळंत
नाहीं की काय म्हणावं, पण मग मी म्हणतो,
की चांगलं आहे, की
एपल्स आहेत.
“खूप
सारे एपल्स आहेत!!!”
“फार छान,” मी म्हणतो.
“ही,” पूर्वीसारख्यांच त्रस्त-उत्तेजनेनं रिसीवर माहिती देतो, “ल्येना विदूनोवा,
तिसरा मजला, तुझ्यावरची
शेजारीण! माझ्या ह्यांना कोणीतरी दोन बैग्स भरून एपल्स दिलेत. त्यांना खाता येत
नाहीं. तुटके-फुटके आहेत! मोरंब्यासाठी!!! अर्धे घेऊन घे!!!”
बोलंत
असं होती, की स्पष्ट कळंत होतं:
जर नाही घेतले, तर
एखादी भयंकर घटना होईल, क्रांतिसारखी. तिला खूप विचारावसं वाटंत होतं की इतकी
घाबरली कां आहे, पण विचारण्यांत काही अर्थ नाहीं: ल्येना विदूनोवा –
काटकेली, ऊंच, मध्यम वयाची बाई आहे,
आणि ती नेहमी घाबरलेलीच असते. कुठेही जात असो,
कुणाशीही बोलंत असो – प्रत्येक काम
ती अश्या स्टाइलमधे करते, जणु युद्ध चाललं आहे आणि आमच्या चारीकडे शत्रूचा घट्ट वेढा
पडला आहे.
मी, ऑफकोर्स, थैंक्यू
म्हणतो, पण त्याची आवश्यकता नाहीये.
“मस्त!
आत्तां सिर्गेइ आणून देईल!”
आणि
तिचा नवरा सिर्गेइ, माझंच नाव असलेला,
तुटक्या एपल्सची पिशवी आणतो, आणि
तीनशे रूबल्स सुद्धां देतो, जे ल्येनाने सात महिन्यांपूर्वी माझ्याकडून तीन
दिवसासाठी उसने घेतले होते.
“थैन्क्यू!”
मी म्हणतो आणि एपल्सची पिशवी किचनमधे घेऊन जातो.
आता
मी आणि मम्मा ओवनमधे एपल्स शिजवतो आणि त्यांत साखर घालून खातो.
आणि
आमच्या बिल्डिंगच्या सहाव्या मजल्यावर कुत्र्यांवाली अक्साना राहते.
कुत्र्यांवाली- अशासाठी, की असं कधीही नाही झालं की,
सकाळ असो वा संध्याकाळ, उन्हाळा
असो किंवा हिवाळा, मी घरांतून निघालो आणि कुत्र्याबरोबर हिंडत असलेली
अक्साना मला भेटली नाही. आणि दरवेळेस ती वेगवेगळ्या कुत्र्यांबरोबर हिंडते. तिची
सगळी कुत्री लहान-लहान आहेत, घराच्या आतंच
राहणारी आहेत, पण खूप रागीट आहेत आणि सदा भुंकतंच असतात. ती कुत्रे
कां बदलते? अशासाठी, की अक्सानाजवळ एकच कुत्रा जास्त दिवस नाही टिकंत.
सुरुवातीला, जवळ-जवळ दोन वर्षांपूर्वी,
तिच्याकडे विकी होता, लाल
केस असलेला. त्याने भुंकून-भुंकून सम्पूर्ण बिल्डिंगला वेड लावलं आणि मरून गेला.
“आजारी
होता,” अक्सानाने सांगितलं.
मग
आला एक काळा कुत्रा, विकी सारखांच,
पण ह्याचं नाव होतं जस्सी.
अक्सानाच्या हातांतून सुटून बिल्डिंगच्या मागे पळाला,
आमची बिल्डिंग रस्त्याच्या बाजूलांच
आहे, आणि कारच्या खाली आला. आतां अक्सानाकडे आहे ब्येली.
पांढरा आहे, काळे चट्टे असलेला,
हा सुद्धां असा भुंकतो जसं त्याला
कुणी मारलं आहे.
हिवाळ्यांत
अक्साना आपल्या कुत्र्यांना विशेष प्रकारचे कोट घालते,
ज्याने त्यांना थंडी नाही वाजणार. पण
कुत्र्यांशिवाय अक्साना ह्यासाठीसुद्धां प्रसिद्ध आहे,
की तिला आमच्या बिल्डिंगच्या
प्रत्येक माणसाबद्दल सगळं माहितीये.
“नवव्या
मजल्यावरच्या दीनाला मुलगी झालीय.”
“फेद्या
पलेतायेव मेला.”
“वेरा
तरासोवावर कोर्ट केस होणारेय.”
मला
बरेंचदा कळतंच नाही, की ती कुणाबद्दल बोलतेय,
पण काहींतरी प्रतिक्रियातर द्यावीच
लागते नं. काही तरी सांगून टाकतो, नेहमीच नाही,
कदाचित,
अधून मधून.
पण
अक्सानाशी वार्तालाप ह्याच मुद्द्यावर येऊन थांबतो की माझं लग्न झालंय किंवा नाही, आणि
मी केव्हां लग्न करणारेय. सुरुवातीला हा प्रश्न अक्सानाची मम्मी ताइस्या ग्रिगोरेव्ना
बरेंचदा विचारायची, पण मग ताइस्या ग्रिगोरेव्नाचे पाय दुखू लागले, आणि
तिने घराबाहेर पडणं बंदच केलंय. म्हणून तिची जागा आता अक्सानाने घेतलीय.
स्टोअरमधे
जातो, काही सामान विकंत घेतो आणि परंत येतो. आन्या आण्टी फोन
करते.
“सिर्योझ, चहा
प्यायला ये! चीज़-पैनकेक केलंय!”
आनंदाने
जातो, कारण मी इथे कांहीही म्हटलं तरी, आन्या
आण्टीशी मी खूपंच चांगलं वागतो.
आन्या
आण्टीला आपल्या चारीकडच्या जगांत खूपच इंटरेस्ट आहे,
जे टी.वी.स्क्रीनवर सगळ्यांत
चांगल्या प्रकारे दाखवले जाते, आणि साप्ताहिक पेपर “आर्ग्युमेंट्स एण्ड फैक्ट्सच्या”
पानांवरसुद्धां.
मी
चहा पितो, तेव्हां आन्या आण्टीचे चारही टी.वी. चालू असतात, प्रत्येक
खोलीत एक-एक आणि किचनमधे पण. त्यांच्यावर वेगवेगळ्या चैनल्स दाखवण्यांत येत आहेत, आवाज़
खूप मोठा आहे, कारण शेपिलोवाला कमी ऐकू येतं. पण स्वत: आन्या आण्टी
ह्यावेळेस अरुंद कॉरीडोरमधे कुणाशी
तरी फोनवर बोलतेय:
“हो, वालेच्का, फक्त
कडक गादीवरंच झोपलं पाहिजे! काय?!”
“उच्कुदू-ऊक, तीन
विहिरी!” किचनचा टी.वी. गातोय.
“शिवाय,
वर्षाच्या सुरूवातीपासून रूसमधे निर्वासितांचं येणं कमी नाही होणार, ह्या
गोष्टीकडेसुद्धां, निःसंदेह, लक्ष द्यायची गरज आहे,”
हॉलमधला टी.वी. सूचना देतोय.
“हो, हो!”
आन्या ओरडते. “आणि उशी न घेतां!”
“इसाउल, इसाउल, घोडा कां सोडला!” कॉरीडोरलगतच्या लहान्या खोलीतला
टी.वी. आपल्या मोट्ठ्या आवाजांत आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत आहे.
“वालेच्का, काय?! नाहीं, गरज नाहीये! आणि जास्त हिंडलं पाहिजे! गति म्हणजे -
जीवन आहे! वालेच्का तुझा आवाज़ बिल्कुल ऐकूं येत नाहीये!”
मग, जेव्हां
गोष्टी संपलेल्या असतांत, चहा पिऊन झालेला असतो,
तेव्हां कळतं, की
मला चिकन-बटाटा नक्कीच खावा लागेल (माझ्या अनुभवावरून सांगतो की जोपर्यंत आन्याने
दिलेला प्रत्येक पदार्थ खात नाहीं, तोपर्यन्त तिच्या घरांतून बाहेर पडूंच शकत नाहीं). मी
खातो, आणि शेपिलोवा हॉलमधे ठेवलेल्या गोल टेबलाशी बसते, हातांत
रंगबिरंगे पेन घेऊन साप्ताहिक पेपर “आर्ग्युमेन्ट्स एण्ड फैक्ट्स” वर मान वाकवते.
आन्या फक्त हाच पेपर वाचते, जणुं दुसरं काही वाचणं तिच्या सिद्धांतांत बसतंच
नाहीं. मी तिला आमच्या प्रसिद्ध व्यक्तींची जीवन चरित्रे, प्रकृतितील
मनोरंजक तथ्यांबद्दल, वैज्ञानिक आविष्कारांबद्दल वेगवेगळ्या प्रकाराची
पुस्तकं भेट दिली, पण माझ्या लक्षांत आलं,
की किचनच्या बेसिनजवळ त्यांचा ढेर
पडला आहे, कदाचित फेकून देण्यासाठी,
किंवा असंच काहींतरी करण्यासाठी.
“आर्ग्युमेन्ट्स एण्ड फैक्ट्स” कुठली-कुठली,
पण आन्याला हवी असलेली जीवनोपयोगी
माहिती पुरवायचा.
विसोत्स्कीबद्दल
लेख, जो त्याच्याबद्दलची फिल्म “विसोत्स्की. थैंक्यू फॉर
बीइंग अलाइव” रिलीज़ झाल्यावर न वाचणं अशक्य होतं. एक छोटासा पैरेग्राफ़, की
मित्रांच्या, चाहत्यांच्या गराड्यांत सतत असूनसुद्धां तो आतून अगदी
एकटा होता, लाल रंगाच्या तिहेरी रेषांनी रेखांकित केलेला आहे. ‘मणक्याच्या
हाडाला आधार देण्यासाठी कडक गादीवर, आणि शक्य तोवर,
उशी न घेतां झोपायला पाहिजे’, ह्या माहितीवर सम्पूर्ण हिरवा रंग फिरवलेला होता.
गाल्किनच्या फोटोच्या चारीकडे, माहीत नाही कां,
काळं वर्तुळ बनवलेलं होतं. जर ह्याला
रचनात्मक कार्य म्हणायचं टाळलं तर, थोडक्यांत म्हणजे खरोखरंचं सम्पादन चालू होतं! नंतर हे
सगळे भाग कापले जातांत आणि सर्वांत छोट्या खोलीत एका लहानश्या टेबलवर गड्डी करून
ठेवले जातांत.
पेपरमधली
महत्वपूर्ण माहिती वेगवेगळ्या रंगानी
रेखाटून झाल्यावर आन्या आण्टी थकून जाते,
आणि हट्ट करते, की
मी उद्या तिच्याबरोबर थियेटरला जावं. थियेटर मला फारसं आवडंत नाहीं, काही
तरी सबब सांगून मी नाहीं म्हणून टाकतो, पण आन्या आण्टीच्या ह्या प्रस्तावाबद्दल आणखी एक गोष्ट
सांगावीशी वाटते.
माझ्या
आवडत्या, अतिथिप्रिय ह्या शेजारणीला थियेटर्स आणि कॉन्सर्ट्सला
जायला फार आवडतं. तिथे, जेव्हां ‘शो’ चालू असतो, तेव्हां ती नक्की झोपून जाते, कारण
आपल्या वादळी हालचालींनी ती आधीच थकलेली असते,
वरून झोप न येण्याची कम्प्लेन्ट
सुद्धां आहे. पण ह्याने ‘शो’बद्दल सांगायला तिला काहींच अडचंण येत नाहीं, ती
मजेत सांगते, की ‘शो’ कित्ती छान होता,
आणि तिला सगळंच कसं आवडलं, म्यूजिक, ड्रेसेज़...आन्या
आण्टीला तिने बघितलेला प्रत्येक ‘शो’ आवडतो. फक्त एकदां,
जेव्हां तिला ‘बल्शोय’ थियेटरमधे
होत असलेला ‘कार्मेन’ तिला आवडला नव्हता. तिला ह्यागोष्टीचा फार राग आला, की
जुन्या ढंगाच्या ड्रेसेस ऐवजी कलाकारांनी काही दृश्यांमधे स्विमिंग सूट्स घातले
होते. असं वाटतं, की ‘बल्शोय’ मधे काही कारणास्तव ती झोपूं नव्हती शकली...
आन्या
आण्टीच्या घरून निघतो. पोट गच्च भरलं आहे,
डोक्यांत विचार पण भरले आहेत, आणि
खिडकी जवळच्या गार्बेज-पाइपच्या जवळून यारोस्लाव माझं अभिवादन करंत जोराने म्हणतो
“ग्रेट!”. तिथे बरेंच लोक जमा होते.
“नमस्कार,” मी उत्तर देतो.
मला
आश्चर्य वाटतं, की खालून कुत्रेवाली अक्साना आपला नेहमीचा प्रश्न
ओठांवर चिटकवून, की मी लग्न केव्हां करणारेय, दिसंत
नाहींये...
काही
दिवसांपूर्वी मला बरेंच दिवसांसाठी बाहेर जावं लागलं होतं. परत आल्यावर माझ्या
मनांत विचार आला, की ओरडणारे टी.वी.,
संध्याकाळच्या उत्तेजित टेलिफोनचं
“तर!” म्हणणं, यारोस्लाव आणि अक्सानाच्या कुत्र्यांविना मी ‘बोर’ झालो
होतो. मला कळून चुकलं की हे सगळे लोक माझ्या कल्पनेपेक्षांही मला जास्त प्रिय आहेत, आणि
मी त्यांच्याबद्दल लिहायचं ठरवलं.
स्टेशनवरून
घरी आल्यावर, जो पर्यंत आन्याने घण्टी वाजवून हे नाहीं सांगितलं की
उद्या मश्रूम्सचं लोणचं घ्यायला बाजारांत जायचं आहे,
मला चुकल्या-चुकल्यासारखं वाटंत
होतं. कचरा ठेवायला बाहेर निघालो, आणि यारोस्लावने प्रॉमिस केलं की उद्यांच तो आणि
च्योर्नीमिळून तुटलेला काच बसवून देतील,
जो आत्तांच च्योर्नीच्या डोक्याचा
मार लागून फुटलाय, ह्या फुटलेल्या काचेतूंन मी अक्सानाला बघितलं, जी
आपल्या ब्येलीला बोलवंत होती, आणि ल्येना विदूलोवालापण बघितलं, ती
स्टोअरमधून सामानाने भरलेली हिरवी बैग आणंत होती. “सगळं ठीक आहे,” मी आपल्या अंतरात्म्याचा आवाज़ ऐकला, “तू घरी पोहोचलाय”.
आणि
एपिल-मेमधे, जेव्हां ऊन वाढूं लागेल,
अक्साना आणि ल्येना संध्याकाळी
आमच्या बिल्डिंगच्या जवळ छोट्याश्या बेंचवर बसतील आणि,
मला बघतांच गिटार आणून वाजवायचा हट्ट
धरतील. मी वाजवेन, आणि तेव्हां अक्साना विचारमग्न होऊन म्हणेल:
“काय
गातो! – आणि अजूनपर्यन्त लग्न नाहीं झालं!”
माझा
मनांत विचार आला, की असला विचार करणं,
खरोखरंच अन्याय आहे, पण
मे महिन्याचं वारं, ह्या विचाराला हिरव्या-हिरव्या कम्पाउण्डमधे खोलवर
घेऊन जातंय, आणि तो तिथेच कुठेतरी हरवतोय, पुन्हां
कधीच परत न येण्यासाठी, जणु काही तो मनांत कधी आलांच नव्हता...
लेखकाचे मनोगत...
माझा
जन्म सुप्रसिद्ध हीरो-सिटी स्मोलेन्स्कमधे सन् 1978मधे झाला आणि मी तिथे
सेप्टेम्बर 1985पर्यंत राहिलो. स्मोलेन्स्कमधे माझे जवळ-जवळ सगळे जवळचे नातेवाईक
राहायचे, मम्मीकडचे आणि पापांकडचेही.
माझे
मम्मी-पापा नौकरी करायचे (पापा सैन्यात होते,
आणि मम्मी रेडिओ स्टेशनवर), आणि
मी नर्सरी शाळेत जायचो, तिथे मी बरेंचदा आजारी पडायचो, म्हणून
मी बराच काळ आजी-आजोबांकडे राह्यलो. म्हणूनंच माझ्या ह्या लघु कादंबरिकेत आजीची, पणजीआजीची, आणि
आजोबाची गोष्ट आहे. आणि व्लादिक – माझा मावस भाऊ आहे – मम्मीची बहिण – स्वेता
आण्टीचा मुलगा. त्यांचे कुटुम्बसुद्धां स्मोलेन्स्कमधेंच राहायचे. आणि तसं पण – माझ्या
गोष्टींचे बाकी पात्रंसुद्धां खरेखुरेच आहेत – ते त्या काळांत आमच्या कम्पाऊण्डमधे
राहायचे, किंवा माझ्या नातेवाइकांचे मित्र होते. मी एकही
काल्पनिक प्रसंग लिहिलेला नाहीये.
त्याकाळचे
स्मोलेन्स्क म्हणजे एक शांत, हिरवळीनं बहरलेलं शहर असयाचं, ज्यांत, म्हातारपणामुळे
चरमरंत ट्रामगाड्या घसटायच्या. सामूहिक फार्मच्या बाजारांत आमच्या आवडीचे बियाणे, कलिंगड
आणि चेरीज़ विकायचे, आणि शहरांतल्या सिनेमा हॉल्समधे वेगवेगळ्या
प्रकाराच्या, नव्या आणि जुन्या इण्डियन फिल्म्स दाखवायचे....
आज
तो काळ मला स्वर्गासारखा वाटतो, ज्याला, मला वाटतं, मी कधीच विसरूं नाहीं शकणार. आम्हीं मॉस्कोला आल्यावर
पण, जवळ-जवळ सन् 1994पर्यंत मी सगळ्या सुट्ट्या आणि सगळे
उन्हाळे स्मोलेन्स्कमधेच घालवायचो, स्वर्गाच्या अनुभवाला खूप वेळ अनुभवायच्या प्रयत्नांत, कारण
तिथेच माझं खरं जीवन होतं. आण्खी कोणत्याही शहराने आणि देशाने मला कधीच आकर्षित
नाहीं केलं, हे सांगताना घाबरणार नाहीं,
की मी जणु तिथेच बंदिस्त झालो होतो.
सन् 1998मधे माझे आजोबा वारले (‘इण्डियन फिल्म्स’
ह्या लघु-कादंबरिकेचे पर्तोस) आणि
स्वर्गाची जाणीव संपली. मी स्मोलेन्स्कला जात राहिलो,
पण ही वेगळ्याच प्रकारची ट्रिप
असायची.
सन्
2005मधे मी मॉस्को स्टेट युनिवर्सिटीतून जर्नलिज़्मचा कोर्स पूर्ण केला, सुरुवातीला
एका प्रकाशनगृहामधे काम केलं, मग रेडिओवर,
पण लेखकांसाठी आयोजित केलेल्या
सेमिनार्समधेही मी जायचो, माझ्या रचना प्रकाशित होत होत्या, आपल्या
गोष्टी आणि कविता मी वेगवेगळ्या पब्लिक फोरम्समधे प्रस्तुत करंत होतो (तसं तर
लहानपणीच मी लिहायला सुरुवात केली होती,
पण काही व्यवस्थित जमलं नाहीं).
लेखिका मरीना मस्क्वीना, कवियत्री एवम् अनुवादिका मरीना बरदीत्स्काया, कवियत्री
तात्याना कुज़ोव्लेवाया, आलोचक इरीना अर्ज़ामास्त्सेवाया, कवियत्री
आणि नाटककार एलेना इसायेवा आणि एडवर्ड निकोलायेविच उस्पेन्स्की – ह्या मंडळींशी
संवाद करणं फार अवघड वाटायचं. एडवर्ड उस्पेन्स्कीने जेव्हां माझ्या रचनांची तारीफ़
केली, तेव्हां मला विश्वास वाटू लागला, की
मी लेखक आहे. मी इरीना युरेव्ना कवाल्योवाचा आभारी आहे,
ज्या लीप्कीमधे आयोजित तरूण लेखक
मंचाच्या आयोजकांपैकी आहेत, ज्यांत मी सन् 2004मधे भाग घेतला होता, त्यांच्याकडून
मिळालेल्या प्रोत्साहनासाठी आणि प्रेमळ वागणुकीसाठी धन्यवाद देऊं इच्छितो.
मी
विशेषकरून मुलांसाठी लिहिण्याचा प्रयत्न नाही केला – बस, मनांत
येईल ते लिहीत गेलो, उलट मी मोठ्यांसाठीच लिहीत होतो. पण, तरीही, मला
मुलांचा लेखक म्हणूं लागले. ठीक आहे, मी विरोध नाही करंत.
जे
लोकं हे पुस्तक वाचतील त्यांना अगदी हृदयांतून धन्यवाद. आणि ज्यांना हे आवडेल, त्या6ना
आनंदाने आपला मित्र समजेन.
नेहमीच आपला
सिर्गेइ पिरिल्याएव
अनुक्रमणिका
प्रस्तावना
तीन पासून
अनन्तापर्यन्त
जेव्हां
आम्हीं गैस स्टेशनवर हिंडायचो...
मेरा नाम
जोकर...
ते
सोनेरी दिवस...
मी आणि वोवेत्स फोटो प्रिन्ट करतो...
मी परामनोवैज्ञानिक
हीलर कसा झालो...
मी
फुटबॉल मैच बघतो...
माझं प्रेम...
लवकरंच ऑगस्ट येणारेय....
इण्डियन
फ़िल्म्स
अगदी-अगदी सुरुवातीपासून...
औषधी पाल्यांचा संग्रह...
इण्डिया, दोन सिरीज़....
मी आणि व्लादिक फ़िल्म्स
बनवतो......
माझी
पणजी – नताशा
समर
कॉटेज. सणाचे दिवस आणि नेहमीचे दिवस...
मी
आणि व्लादिक – लेखक...
मी आणि व्लादिक – बिज़नेसमैन
फुटबॉल-हॉकी
माझे आजोबा मोत्या, पर्तोस
आणि पालनहार....
पुन्हां
पणजीआजी नताशा आणि फाइनल...
उपसंहार
परिशिष्ट
आन्या आण्टी आणि इतर
लोकं...
लेखकाचे मनोगत...